Nagpur Violence Mastermind: नागपूरमधील तणावाची परिस्थिती सध्या निवळताना दिसत असली तरीही इथं काही भागांमध्ये मात्र अद्यापही संचारबंदीचे निर्देश लागू असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी नागपूरमध्ये झालेल्या दोन गटांतील हिंसेनंतर ही परिस्थिती उदभवली असून, त्याचसंदर्भात नागपूरचे सायबर क्राईम पोलीस उपायुक्त लोहीत मतानी यांनी काही महत्त्वाची माहिती एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. यावेळी त्यांनी सदर प्रकरणी 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं.
फहीम खान चं नाव घेत त्याच्यावर सदर प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. इतकंच नव्हे तर, चिथावणीखोर व्हिडीओ तयार करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देत घटनेतील आरोपी नागपूरचे नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. फहीम खानला सध्या घटनेमागचा मास्टरमाईंड म्हणता येणार नाही. पण, या घटनेस कारणीभूत असणाऱ्यांपैकी तोसुद्धा एक असल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
हिंसेचं उदात्तीकरण आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांसह पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी गुन्ह्याची नोंद या घटनेनंतर करण्यात आल्याचं सांगत चुकीची आणि चिथावणीखोर सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे असं मतानी यांनी सांगत या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेनं जात आहे याची सविस्तर माहिती दिली. सदर प्रकरणात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांसाराख्या समाज माध्मयांना पत्र लिहून माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून तूत्तास 50 टक्के चिथावणीखोर पोस्ट डिलीट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या तणावाच्या परिस्थितीनंतर जवळपास 200 पोस्टची पडताळणी करत त्यांची माहिती मिळवण्यात आली ज्यामुळं येत्या दिवसात या प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार असल्याचा थेट इशाराही त्यांनी दिला.
नागपूर घटनेनंतर आता प्रक्षोभक घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता या प्रकरणात बांगलादेश कनेक्शनची माहिती मिळवण्याचं काम सुरू असल्याचं सांगताना या घटनेमध्ये चिथावणीखोर व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती पोलीस उपायुक्तांनी माध्यमांसमोर मांडली.
दरम्यान, नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलं. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट करत हे आवाहन करण्यात आलं. या प्रकरणात पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत असल्याचं असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.