)
Koregaon Park Temperature: पुणे म्हटलं की थंड हवामान, झाडांनी नटलेले रस्ते आणि सुखद वातावरण अशी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. त्यातही कोरेगाव पार्क हा परिसर शहरातील सर्वाधिक हिरवागार आणि आलिशान भाग म्हणून ओळखला जातो. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे याच परिसरात अलीकडच्या काळात पुण्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. झाडांची दाटी असूनही कोरेगाव पार्क इतर भागांपेक्षा अधिक गरम का होत आहे, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची कारणे समोर आणली आहेत. तज्ज्ञांनी सांगितलेली कारणे पुणेकरांन
एकेकाळी कोरेगाव पार्कमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा थंडावा जाणवत असे. मात्र गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. हवामान केंद्रांच्या नोंदीनुसार कोरेगाव पार्कमध्ये किमान आणि कमाल तापमान सातत्याने जास्त नोंदवले जात आहे. अलीकडे शिवाजीनगरमध्ये 24.9 अंश सेल्सिअस तापमान असताना कोरेगाव पार्कमध्ये ते 27.1 अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे हा परिसर पुण्यातील सर्वाधिक उष्ण भागांपैकी एक ठरत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) तज्ज्ञांच्या मते, कोरेगाव पार्कमधील वाढत्या तापमानामागे ‘अर्बन हीट आयलंड’ म्हणजेच शहरी उष्णता बेट परिणाम हे प्रमुख कारण आहे. मोठ्या प्रमाणावर काँक्रीटची बांधकामे, रस्ते, पार्किंग आणि इमारती दिवसभर उष्णता शोषून घेतात. रात्री ही उष्णता हळूहळू बाहेर पडत असल्याने परिसर लवकर थंड होत नाही. परिणामी रात्रीचे तापमानही तुलनेने जास्त राहते. यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास अधिक जाणवतो.
कोरेगाव पार्कमध्ये झाडांची संख्या मोठी असली तरी गेल्या काही वर्षांत व्यावसायिक प्रकल्प, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि निवासी संकुलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वाढत्या बांधकामांमुळे मोकळी जमीन कमी झाली असून नैसर्गिक थंडावा निर्माण करणाऱ्या जागांचे प्रमाण घटले आहे. तज्ज्ञांच्या मते, हिरवाई टिकून असली तरी वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणारी उष्णता त्यावर मात करत आहे. त्यामुळे परिसरातील सूक्ष्म हवामान म्हणजेच तिथलं मायक्रोक्लायमेट बदलताना दिसतंय.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार लोहेगाव, मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क या भागांमध्ये वारंवार सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. काही दिवसांपूर्वी कोरेगाव पार्कमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले होते. तर शहरातील अधिक हिरवाई असलेल्या एनडीए, पाषाण आणि लवळे परिसरात तुलनेने कमी तापमान नोंदवले गेले. यामुळे फक्त झाडांची संख्या नव्हे तर परिसरातील बांधकामांची घनता आणि जमिनीचा वापरही तापमानावर परिणाम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते, शहरीकरणाचा वेग असाच राहिला तर पुण्यातील अनेक भागांमध्ये उष्णता बेटांचा प्रभाव आणखी तीव्र होऊ शकतो. त्यामुळे शहर नियोजनात अधिक हिरव्या जागा, खुली मैदाने, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक बांधकामांवर भर देणे आवश्यक आहे. अन्यथा केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षातील बहुतांश काळ नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. संशोधकांनी नागरिकांनीही वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.