राज ठाकरेंच्या एन्ट्रीमुळे मविआला बळ मिळणार? काँग्रेसची भूमिका काय?

Raj Thackerays entry: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मनोमिलन झाल्यानंतर लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 14, 2025, 09:15 PM IST
राज ठाकरेंच्या एन्ट्रीमुळे मविआला बळ मिळणार? काँग्रेसची भूमिका काय?
राज ठाकरे

Raj Thackerays entry: निवडणूक आयोगात मविआच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेही पोहोचले होते. दरम्यान यानंतर राज ठाकरेंच्या मविआ एन्ट्रीची चर्चा जोर धरू लागली आहे.. राज ठाकरेंच्या येण्यानं मविआला बळ मिळणार अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, राज ठाकरेंबाबत काँग्रेसमध्ये मतमतांतर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Add Zee News as a Preferred Source

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मनोमिलन झाल्यानंतर लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे मनसे मविआमध्ये समाविष्ट होणार का? असाही प्रश्न निर्माण होतोय.. कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना मविआमधील एक प्रमुख पक्ष आहे. त्यामुळे ठाकरे एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार का? की राज ठाकरे मविआत जाण्यासाठी तयार होणार? यावरून देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मात्र, आज मविआच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला बेधडकपणे सवाल केलेत, त्यामुळे मविआत एक नवं चैतन्य पाहायला मिळालं. तसंच राज ठाकरेंमुळे मविआला बळ मिळणार अशीही चर्चा आता सुरू झालीय.

राज ठाकरेंना मविआमध्ये घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतमतांतर असल्याची चर्चा आहे. एक गट राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहे. तर दुसरा गट हा विरोधात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दरम्यान आजही मविआच्या शिष्टमंडळात हर्षवर्धन सपकाळ गैरहजर
होते. त्यावरून वेगवेगळे तर्क-वितर्क लावण्यात आलेत..

दिल्लीत हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मनसेबाबत आपली रोखठोक भूमिका मांडलीय. मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. तर मनसेला मविआत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चेन्नीथला यांनी म्हटलंय.तर दुसरीकडे काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं विधान संजय राऊतांनी केलं होतं. राऊतांच्या या विधानानंतर मनसेमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली होती. यानंतर राऊतांनी थेट राज ठाकरे यांना मॅसेज करत केलेल्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलं होतं.

आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र, ठाकरे बंधू मविआला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण संजय राऊतांचं विधान आणि त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगात जाणं यावरून आता वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलंय.

राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला सवाल 

मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला अनेक परखड सवाल केलेत.निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. त्यामुळे, नुकतेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही, असेही राज यांनी म्हटलं.जे आज 18 वर्ष वय पूर्ण करत आहेत, त्यांनी मतदान करू नये का? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. अनेक जिल्ह्यात दोन-दोन ठिकाणी मतदारांची नावं आहेत, त्याचं काय करायचं, असा सवालही राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला विचारला. मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाचं काय करायचं, असाही प्रश्न राज ठाकरेंनी आयोगापुढे उपस्थित केला आहे. मतदारयादीतील एका मतदाराच्या मतदार ओळखपत्रावर पाहिले असता वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी असल्याची बाब राज ठाकरेंनी निदर्शनास आणून देत प्रश्न केला. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. त्यामुळे, राज ठाकरेंनी जनतेच्या आणि उमेदवारांच्या मनातील प्रश्न बेधडकपणे आयोगाला विचारले आहेत. 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅट मशीन लावा, अशी सूचनाही राज ठाकरेंनी केलीय.

FAQ 

१. राज ठाकरे मविआच्या शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाला भेटण्याचे कारण काय?

राज ठाकरे हे महाविकास आघाडी (मविआ) च्या शिष्टमंडळासोबत १४ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले. यामध्ये आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादीतील त्रुटी, पारदर्शकता आणि निवडणूक प्रक्रियेवरील आक्षेप नोंदवले गेले. ठाकरे बंधू उद्धव आणि राज यांनी एकाच कारमधून प्रवास करत एकजुटीचे प्रदर्शन केले, ज्यामुळे युतीच्या चर्चांना वेग आला आहे.

२. राज ठाकरेंचा मविआमध्ये प्रवेश होणार का? काँग्रेसची भूमिका काय?

राज ठाकरेंच्या मविआ प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे, विशेषत: ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर. मात्र, काँग्रेसमध्ये मतभेद आहेत – एक गट सकारात्मक असून दुसरा विरोध करतो. हर्षवर्धन सपकाळ आणि रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि मविआत घेण्याबाबत चर्चा झालेली नाही. संजय राऊतांच्या विधानानंतर स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी, राज ठाकरेंमुळे मविआला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.

३. ठाकरे बंधूंची युती आणि आगामी पालिका निवडणुकीवर परिणाम काय होईल?

उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील मनोमिलनानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे, विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित लढण्याबाबत. गेल्या तीन महिन्यांत पाच वेळा भेटी झाल्या आहेत. मात्र, मविआमधील शिवसेना (उट) च्या भूमिकेमुळे उद्धव मविआ सोडतील का किंवा राज मविआत येतील का, असा प्रश्न आहे. यामुळे महायुतीला धक्का बसू शकतो आणि विरोधकांची एकजूट मजबूत होईल, ज्यामुळे पालिका निवडणुकीचे चित्र बदलू शकते.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More