)
Fadnavis On Ashok Kharat Case: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. मंगळवारी मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या 'झी 24 तास'च्या 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार सोहळ्यामध्ये फडणवीस यांनी 'झी 24 तास'चे मुख्य संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या खास मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केलं.
नाशिकमधील काही प्रकरणं मागील काही काळात चांगलीच चर्चेत असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी नाशिकमध्ये पुढल्या वर्षी आतापर्यंतचा सर्वात चांगला कुंभमेळा आयोजित केला जाणार असल्याने नाशिकला बदनाम करु नये असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी खरात प्रकरणावर भाष्य केलं. "भोंदू खरात प्रकरणात आस्थेचा गैरफायदा घेऊन विशेषत: महिलांशी गैरव्यवहार, दुर्व्यवहार केला या प्रकरणात त्याला कडक शिक्षा होईल, असं मी महाराष्ट्राला आश्वासन देऊ इच्छितो. कोणत्याही परिस्थितीत तो बाहेर येणार नाही. ज्या ज्या महिलांचा दुरुपयोग त्याने केलाय त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ," असं फडणवीस म्हणाले.
तसेच नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावर बोलातना, "त्या घटनेचा टीसीएस कंपनीशी काही संबंध नाही. कंपनी, तिच्या मॅनेजमेंटचा संबंध नाही. जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. सर्व आरोपी आज तुरुंगात आहेत. त्यामुळे या करता टीसीएसला बदनाम करण्याचं कारण नाही," असं फडणवीस म्हणाले.
याच संदर्भातून पुढे कमलेश सुतार यांनी, "खरातची खूप राजकीय नेत्यांसोबत उठबस होती. त्याचे अनेक राजकीय नेत्यासोबत फोटो आहेत. खरातकडे अनेक राजकीय नेते जाऊन पूजापाठ करुन घेत होते. त्यामुळे दोन शक्यता वर्तवल्या जातात. एक त्याच्यावर कारवाईच होणार आणि दुसरी या सगळ्या कनेक्शनमुळे त्याच्या जीवास धोका असेल," असा प्रश्न फडणवीसांना विचारला.
"खरातविरोधात कारवाई झाली आहे. चार्टशीट दाखल झाली आहे. अजून काही प्रकरणं समोर येत आहेत. महिला असल्याने त्यांना तयार करावं लागतं. धीर द्यावा लागतो. अडचण येणार नाही सांगावं लागतं. महिला प्रमुख अधिकारी प्रकरण पाहत आहेत. त्यांच्या माध्यमातून पुरावे समोर आणले गेले. खरातच्या जीवला कोणताही धोका नाही. त्याची पूर्व काळजी घेऊन. त्याला न्याय व्यवस्थेतून ही प्रवृत्ती समाप्त व्हावी असा आम्ही न्याय देऊ," असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
खरात प्रकरणाचा संदर्भ देत राजकीय नेत्यांना सल्ला देताना फडणवीस यांनी, "सर्वच लोक मोठ्या प्रमाणात अशाप्रकारे जे काही बाबा असता त्यांच्याकडे लोक आकृष्ट होतात. त्याने हा चमत्कार केला तो चमत्कार केला असं सांगतात आणि त्यांच्याकडे रांग लागते. काही समाजाचं हित पाहून काम करतात. काही भोंदूगिरी करतात. त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं आहे की, आमच्याकडे अनेक लोक येतात. हे लोक कोणाची ओळख काढून येतात. कधी स्वत:हून येतात. अशा लोकांशी संपर्क ठेवताना थोडी पडताळणी केली पाहिजे. राजकीय लोकांकडे पाहून लोक अशा लोकांकडे जातात. त्यामुळे खरंच असे लोक सात्विक आहे का हे आपण पाहिलं पाहिजे," असं फडणवीस म्हणाले.