Dharashiv Crime News : राज्यात प्रेम प्रकरणातून मारहाणीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी धाराशिवमधील 18 वर्षीय तरुणाला प्रेम प्रकरणातून अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव माऊली गिरी होते.मारहाण झाल्यानंतर माऊली गिरीला सोलापुराताली खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. गेल्या काही दिवसांपासून खाजगी रुग्णालयात माऊलीवर उपचार सुरु होते. मात्र, मारहाणीनंतर चौथ्या दिवशी मृत्यूशी झुंज देणाऱ्या 18 वर्षीय माऊली गिरीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, माऊली गिरीला मारहाण झाल्यापासून तो शुद्धीवर आला नसल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांनी दिली. तो गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात होता. एकुलता एक मुलाचं काही बरं वाईट झालं तर आम्ही आत्महत्या करू असे म्हणत आईनं आक्रोश केला होता. त्यासोबत माऊली गिरीला मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी माऊलीच्या आई-वडिलांनी केली आहे.
माऊलीला 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून मारहाण
धाराशिवमधील 18 वर्षीय माऊली गिरीला प्रेम प्रकरणातून 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रोड, काठीने अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर माऊलीला मृत समजून त्याला भूम तालुक्यातील पांढरेवाडी येथील शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले होते. त्याचबरोबर माऊलीच्या गुप्तांगालाही मोठ्या प्रमाणात इजा करण्यात आली होती. अमानुष पद्धतीने मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे आरोपींना समजले. आरोपींनी त्याला विवस्त्र अवस्थेत फेकून दिले आणि निघून गेले.
त्यानंतर माऊली गिरीला सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. माऊली गिरी मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी सतीश जगतापसह सात जणांविरोधात अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. माऊलीला झालेल्या मारहाणीनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. माऊलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.