Beed Crime News : बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेतील शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र तक्रार दाखल न करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड शहरातील कृष्ण अर्बन बँकेच्या आवारात धनंजय नागरगोजे या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी नागरगोजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. 18 वर्षांपासून पगार न मिळाल्याने धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या फेसबुक पोस्टमध्ये करण्यात आला होता.
या घटनेनंतर कोणीही या प्रकरणात तक्रार न देण्यासाठी पुढे न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, किमान वेतन कायदा डावलल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करा. तसेच संबंधित संस्थाचालक यांच्या विरुद्ध देखील आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
शिक्षक आत्महत्या प्रकरण सभागृहात
बीडमधील धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येचा मुद्दा आज विधान परिषद सभागृहात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावेळी दानवेंनी शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी संस्थाचालकावर गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न उपस्थित केला. धनंजय नागरगोजे हे गेल्या 18 वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांना 18 वर्षे पगार न दिल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी पगार मागितला तर त्यांना तू फाशी घे असे उत्तर विक्रम बाबुराव मुंडे यांनी दिले असं धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी आता अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी तात्काळ संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सभागृहात केली. तर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.