डिसले गरुजींचे प्रयत्न शिक्षण अधिकाऱ्यांना नाही दिसले?

काय आरोप केले शिक्षण अधिकारी लोहार यांनी ?  

Updated: Jan 21, 2022, 08:48 PM IST
डिसले गरुजींचे प्रयत्न शिक्षण अधिकाऱ्यांना नाही दिसले? title=

सोलापूर : ज्या व्यक्तीला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळते, ज्या व्यक्तीला ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे, त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वावर आक्षेप घेण्यात आलेत, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेत. हे आरोप केलेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी.        

सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. लोहार यांनी अमेरिकेची स्कॉलरशिप मिळालेले ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांच्यावर हे आरोप केले आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत. अशावेळी डिसले गुरुजी यांनी विविध प्रयोग करून विद्यार्थाना शिकविण्याचं काम  केलं. शिक्षकांनी आपली गुणवत्ता कशी वाढवावी, ऑनलाईन शिक्षणाला पर्याय काय, परदेशात मुलांना कसं शिक्षण दिलं जातं याचा अभ्यास केला. परिणामी त्यांची वर्ल्ड बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी नियुक्ती झाली. अनेक पुरस्कार मिळाले.

ग्लोबल गुरुजी डिसले यांना अमेरिकेची स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. त्यासाठी त्यांनी दीड महिन्यांपूर्वी आपल्या रजेचा अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडे दिला होता. मात्र, रजा अर्जात त्रुटी असल्यानं तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. अर्ज नामंजूर करण्याचं कारण अदयाप समोर आलं नसलं तरी शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.       

गेल्या ३ वर्षापासून डिसले गुरुजी शाळेत गैरहजर आहेत. रजा अर्जात त्रुटी असल्यानं तो मंजूर झालेला नाही. परदेशात स्कॉलरशिपला गेल्यानंतर शाळेचं काय करणार? आधी शाळेच्या मुलांना शिकवायला हवे ना? जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी त्यांनी काही प्रयत्न केलेत असे मला दिसले नाही, असे आरोप प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. लोहार यांनी केले आहेत.

यावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जे आरोप केले आहेत, त्याच्या संदर्भात लेखी आदेश जिल्हा परिषदेकडून मिळाल्यास त्यावर आपली भूमिका मांडणार असल्याची प्रतिक्रिया डिसले गुरुजींनी दिली आहे.