मोदी हे 'एकटा जीव सदाशिव'; कुटुंबाचा खर्च माहिती नाही- अजित पवार

'मला नाही अब्रु, मी कशाला घाबरू' असे धोरण असलेले सरकार

Updated: Sep 8, 2018, 08:51 PM IST
मोदी हे 'एकटा जीव सदाशिव'; कुटुंबाचा खर्च माहिती नाही- अजित पवार

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'एकटा जीव सदाशिव' आहेत. त्यांना कुटुंब काय असते, ते माहिती नाही. परिणामी कुटुंबासाठी खर्च काय असतो याची कोणतीही माहिती मोदींना नाही. त्यामुळेच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या समस्या त्यांना कळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. 

ते शनिवारी अकोले येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. 'मला नाही अब्रु, मी कशाला घाबरू' अशा प्रकारचे हे सरकार असून आजवर दिलेले कोणतही आश्वासन यांनी पूर्ण केले नाही. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्याचे अजित पवारांनी म्हटले. 

यावेळी पवारांनी भाजप आमदार राम कदम यांचाही समाचार घेतला. राम कदम यांचे नाव बदलून रावण कदम ठेवायला पाहिजे. रामाला सुद्धा वाटत असेल याचे नाव राम कसे ठेवले?  त्यांची ही भाषा भाजपाला शोभते का? असा सवाल अजित पवारांनी विचारला.