द बीड फाइल्स: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्षापूर्ती, घटनाक्रम असा घडला

Sarpanch Santosh Deshmukh Case: बरोबर वर्षभरापूर्वी बीडच्या मस्साजोगमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून क्रूर हत्या करण्यात आली होती. देशमुख यांच्या अमानवी हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. गेल्या वर्षभरात अनेक घडामोडी घडल्यात...मात्र सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे या मागणीवर देशमुख कुटुंबीय अद्यापही ठाम आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 9, 2025, 09:25 PM IST
द बीड फाइल्स:  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्षापूर्ती, घटनाक्रम असा घडला
Sarpanch Santosh Deshmukh Case Completes One Year Today Murder Case Update

Sarpanch Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं अख्खा महाराष्ट्र हादरला होता. त्या क्रूर आणि अमानवीय घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय. आधी संतोष देशमुखांचं अपहरण, त्यानंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे केलेली हत्या. त्यानंतर वर्षभरात या घटनेवरून राज्यात अनेक पडसाद उमटले.

Add Zee News as a Preferred Source

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम

- 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं

- केज तालुक्यातील दैठणा परिसरात त्यांची निर्घृ्णपणे हत्या करण्यात आली

- दुसऱ्या दिवशी 10 तारखेला मनोज जरांगे पाटील मस्साजोगमध्ये पोहोचले

- तब्बल 8 तास ठिय्या दिल्यानंतर पोलीस अधीक्षक फौजफाट्यासह आंदोलन स्थळी पोहोचले

- पोलीस अधीक्षकांनी तीन दिवसात आरोपींना अटक करू असं आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आणि ठिय्या मागे घेण्यात आला

- 3 दिवसांनंतर कुठल्याही आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं

- या आंदोलनाला खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आष्टीचे आमदार सुरेश धस, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जाहीर पाठिंबा दिला

- 9 दिवसांनंतर पाच आरोपींना अटक करण्यात आली. यात प्रामुख्याने विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक यांच्यासह पाच आरोपींना अटक झाली

- त्यापूर्वी 12 डिसेंबरला वाल्मीक कराड याच्यावर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला

- 31 डिसेंबर रोजी वाल्मीक कराड हा पुण्यामध्ये सीआयडी कार्यालयात स्वतःहून शरण झाला

- वाल्मीक कराडला पोलीस कोठडी मिळाली

- केज न्यायालयानं खंडणीमध्ये जामिनाची मागणी केल्यानंतर सीआयडी अधिकाऱ्याकडून वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला

- संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयात आतापर्यंत 20 सुनावण्या झाल्या आहेत

- 12 डिसेंबर रोजी या प्रकरणातील आरोपीवर आरोप निश्चित करण्यात येणार आहेत

- या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यातील आरोपी कृष्णा आंधळेचा अजूनही थांगपत्ता लागला नाहीय...देशमुख कुटुंब आजही न्यायासाठी लढा देत आहे. तर 365 दिवसात म्हणावी तशी कारवाई झाली नसल्याची खंत धनंजय देशमुखांनी व्यक्त केलीय.

संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येला वर्ष पूर्ण झालं तरी अजूनही देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची देशमुख कुटुंबीयांची मागणी आहे. आरोपींना फाशी होत नाही तोवर हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा देशमुख कुटुंबीयांनी दिलाय.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More