आता शेतात उभारणाऱ्या पवनचक्क्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना! कंपन्यांनाही मोठा प्रॉफिट मिळणार; सरकारने...

Windmills Business: यासंदर्भात मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण उपस्थित असतानाच हा विषय चर्चेला आल्यानंतऱ थेट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 4, 2025, 03:11 PM IST
आता शेतात उभारणाऱ्या पवनचक्क्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना! कंपन्यांनाही मोठा प्रॉफिट मिळणार; सरकारने...
शेतकऱ्यांना होणार फायदा (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - रॉयटर्स)

Windmills Business: धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्क्या उभारण्याचा उद्योग वेगाने विस्तारत आहे. पवनचक्की उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे.  त्यासाठी कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील ' मध्यस्थ ' या नावाखाली वाढलेला दलालांचा सुळसुळाट बंद करा. असे आदेश परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. विशेष म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी पवनचक्कीसंदर्भातील वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली होती. मध्यस्थींच्या नावाखालीच मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार चालतात. त्यामुळे आता या मध्यस्थींच्या मुस्क्या आवळण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आपल्याकडे अनेक तक्रारी आल्यात 

पवनचक्क्या उभारणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते, त्या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी शासनाने मध्यस्थ म्हणून काम केले पाहिजे,  शेतकरी आणि संबंधित कंपनी याच्यामध्ये तयार झालेले दलाल हे गुंडगिरी करून शेतकऱ्यांना धमकवतात, तसेच त्याला योग्य मोबदला मिळू देण्यापासून वंचित ठेवतात. अशा अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत, असं सरनाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये सांगितलं. प्रताप सरनाईक या विषयावक मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते .या बैठकीला धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, जिल्हा पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या सह पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.

पोलिसांना कारवाईचे आदेश

पोलीस प्रशासनाने मध्यस्थींच्या विरोधात तक्रार येण्याची वाट न पाहता सुमोटो (Suo Moto ) गुन्हे दाखल करावेत. अशा गुंडांपासून जिल्ह्यात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, अशी आठवण सरनाईक यांनी पोलीस अधिकाऱ्यांना करुन दिली. तसेच पुढे बोलताना, "याबरोबरच संबंधित कंपनीला पवनचक्की उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते सहकार्य करणे देखील आवश्यक आहे. पवनचक्की उभारणी उद्योगातून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित जपले जावे, त्याची फसवणूक होणार नाही.  यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष रहावे असे सरनाईक यांनी आपल्या सूचनेमध्ये केला आहे.

संतोष देशमुख प्रकरण

वर्षभरापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये पवनचक्क्यांच्या राखेसंदर्भातील खंडणीवरुन मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडच्या गुंडांनी अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आलेला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More