देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट

मार्च महिन्यापर्यंत राज्यातील एकूण कोरोना टेस्टपैकी ७० ते ७५ टक्के चाचण्या या एकट्या मुंबईत सुरु होत्या. 

Updated: Jun 5, 2020, 08:39 AM IST
देशातील कोरोनाचे २० टक्के रुग्ण  एकट्या मुंबईत, तरीही चाचण्यांच्या संख्येत घट title=

मुंबई: मुंबईत कोरोनाच्या वाढीचा वेग कमी झाला असा दावा राज्य सरकारकडून केला जात असतानाच आता नवी माहिती समोर आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. मात्र, तरीही राज्य सरकारने मे महिन्यात मुंबईतील कोरोना टेस्टच्या संख्येत लक्षणीय घट केली आहे. दिवसाला १० हजार लोकांच्या कोरोना टेस्ट करण्याची क्षमता मुंबई महानगरपालिकेकडे आहे. मात्र, मे महिन्यात दिवसाकाठी सरासरी ४००० ते ४२०० लोकांच्याच चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे ICMR मधील तज्ज्ञांनी जास्तीत जास्त टेस्ट करण्याचा सल्ला दिला असताना मुंबईत COVID-19 टेस्टची संख्या का घटवण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मुंबईकरांना दिलासा ! कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग जवळपास निम्म्यावर

विशेष म्हणजे मुंबईतील चाचण्यांची संख्या कमी झाली असली तरी संपूर्ण राज्यात मात्र हे प्रमाण वाढवण्यात आले आहे. १ मे रोजी दिवसाला ७,२३७ जणांच्या चाचण्या केल्या जात होत्या. ३१ मे पर्यंत हे प्रमाण १४,५०४ पर्यंत वाढले आहे. याचा अर्थ राज्य सरकारने मुंबईबाहेर चाचण्यांची संख्या वाढवली आहे.

'पुन:श्च हरिओम' : आजपासून बाजारपेठा गजबजणार, पाहा कोणत्या सुविधा पुन्हा सुरु होणार?

मात्र, मुंबई हे कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असताना राज्य सरकारने अवलंबिलेल्या या धोरणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मुंबई आणि पुणे या दोन शहरांत राज्यातील ७० टक्के रुग्ण आहेत. परंतु, आतापर्यंत दोन्ही शहरांतील ५० टक्के लोकांच्या चाचण्याही झालेल्या नाहीत. पुण्यात तर दिवसाला केवळ १२०० ते १५०० कोरोना टेस्टच होत आहेत. मार्च महिन्यापर्यंत राज्यातील एकूण कोरोना टेस्टपैकी ७० ते ७५ टक्के चाचण्या या एकट्या मुंबईत सुरु होत्या. मात्र, मे महिन्यापासून या चाचण्यांची संख्या कमी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.