मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखात मिळणार घर, कधी भरता येणार अर्ज, जाणून घ्या!

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 16, 2025, 12:48 PM IST
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखात मिळणार घर, कधी भरता येणार अर्ज, जाणून घ्या!
4700 homes for BMC conservancy staff in mumbai

Mumbai News: मुंबईत घर घेणे म्हणजे आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. कारण घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पण मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 12 लाखात घरे मिळणार आहेत. 4700 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असून उद्यापासून अर्ज भरता येणार आहेत. महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाचा म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या माहुल परिसरात 225 चौ. फुटांची 4 हजार 700 घरे बांधली असून त्यांची किंमत 12 लाख 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. लॉटरीच्या माध्यमातून ही घरे विकली जाणार असून या घरांसाठी महापालिका कर्मचाऱयांना सोमवारपासून अर्ज करता येणार आहेत. 

माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजारांवर घरे रिक्त आहेत. या रिक्त सदनिकांची पालिकेला देखभाल करावी लागते. त्यामुळे या सदनिका आता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एमएमआरडीएने प्रकल्पबाधितांसाठी इमारती बांधून त्यातील सदनिकांचे हस्तांतरण महापालिकेला केले. विविध विकास प्रकल्पांमध्ये घर बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना येथे राहण्यासाठी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. मुंबई महापालिका प्रशासन म्हाडाच्या धर्तीवर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच लॉटरी पद्धतीने स्वतःची घरे देणार आहे. महापालिका प्रशासनाने माहुल येथे बांधलेल्या इमारतीच्या संकुलात शाळेसह रुग्णालय व इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

पोलिस कर्मचारी आणि डब्बेवाल्यांसाठीदेखील घरे

राज्यातील नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊनच सरकार नवीन हाउसिंग पॉलिसी तयार करत आहेत. उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवीन हाउसिंग पॉलिसीमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल आणि वृद्धांसाठी वृद्धाश्रमांना पॉलिसीत महत्त्वाचे स्थान देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिंदेंनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन पॉलिसीमध्ये वरिष्ठ नागरिक, मिल कामगार, पोलिस कर्मचारी, डब्बेवाले यांच्यासाठी घरांची व्यवस्था असणार आहे.