राज्यात गेल्या २४ तासात ६७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

 कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

Updated: Jun 30, 2020, 12:36 PM IST
राज्यात गेल्या २४ तासात ६७ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
प्रतिकात्मक छाया

मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोविड-१९ची चाचणी केलेल्या ६७ पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आतापर्यंत ५९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाविरुद्ध लढताना पोलिसांना सातत्याने ड्युटी करावी लागत आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील करोनाची बाधा होत आहे. मागील चोवीस तासांत महाराष्ट्रातील पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान, सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) आणखी ५३ जण करोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. तर चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्यांची एकूण संख्या ३५४ झाली आहे. आतापर्यंत ६५९ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आली आहे.