पवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला. 

Updated: Mar 14, 2019, 05:04 PM IST
पवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला  title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही. अहमदनगरची जागा सोडणे शक्य होणार नसल्याचे आम्ही आधीच काँग्रेसला सांगितले होते, असे सांगतानाच अहमदनगरमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मानणारे आम्हाला पाठिंबा देतील, असा टोला  राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला. विखे-पाटील यांनी अहमदनगर येथे राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही, हे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीने हा टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील १२ जागांचा समावेश आहे. यावेळी जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

'विखे घराण्याबद्दल पवारांच्या मनात इतका द्वेष का ?'

दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुंबईतल्या काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत आपली भूमिका मांडली. मात्र बाळासाहेब थोरांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. पक्षातल्या इतर नेत्यांनी मात्र विखेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. थोरातांना आपण नंतर उत्तर देऊ असे विखेंनी सांगितले. तर आपण विखेंवर कोणतीही टीका केलेली नाही. केवळ संभ्रम दूर करण्याचा सल्ला दिल्याचे थोरातांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही - विखे-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर झाली. यात विशेष म्हणजे पहिल्या यादीत मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी मात्र जाहीर झालेली नाही. हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्यात आला असला तरी राजू शेट्टींनी मागितलेल्या बुलडाण्यातून डॉ. राजेंद्र शिंगणेंना तिकिट देण्यात आले आहे. अहमदनगरमधून सुजय विखेंना कोण टक्कर देणार, हेदेखील अद्याप स्पष्ट नाही. काही जागांबाबत काँग्रेससोबत राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर फेरफार होणार आहे. त्याबाबत बोलणे सुरू असून एक-दोन दिवसात तो प्रश्नही निकाली निघेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.