'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'

प्रश्न विचारताच अजित पवार म्हणालेत, मी  बारामतीला चाललोय. त्यामुळे एकच गोंधळ झाला. 

Updated: Nov 13, 2019, 08:54 PM IST
'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'
आघाडीत समन्वय असून मुंबईत बैठकीला सुरुवात झाली आहे. याचे हे छायाचित्र.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा काही केल्या सुटत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना - राष्ट्रवादी - काँग्रेस यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी बोलणी सुरु केली आहेत. मात्र, आज रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक होणार होती. तसे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते. मात्र, अचानक ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक रद्द झाल्याची माहिती दिली. त्याचवेळी काय झाले, असा प्रश्न विचारताच अजित पवार म्हणालेत, मी  बारामतीला चाललोय. त्यामुळे एकच गोंधळ झाला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत असताना आघाडीच्या नेत्यांकडून आमचे ठरलं आहे. सगळं काही ठिक आहे, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार थट्टेने म्हटले असेल, असे स्पष्ट केले. त्याआधी नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ते थट्टेत बोलले असतील. असं काहीही झालेले नाही. अजितदादा मुंबईतच आहेत, अशी माहिती दिली. तर खासदार सुनील तटकरे यांनीही  दादा यांनी तसे थट्टेत म्हटले असेल असे सांगितले.

समन्वय बैठकीआधीच अजित पवार तडकाफडकी निघून गेले आणि त्यांनी जाताना बारामतीला जातो आहे, असे माध्यमांना सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होती. मात्र, राष्ट्रवादीच्या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी निघून गेले. मी बारामतीला जातो आहे, बैठक रद्द झाली आहे. पुढचे मला काहीही माहित नाही, असे सांगून अजित पवार कारमध्ये बसून निघून गेले. दरम्यान, याबाबत शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देत अजित पवार मुंबईतच आहेत असे सांगितले. बारामतीला जातो हे वक्तव्य त्यांनी चेष्टेने केले असावे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत स्पष्टीकरण यांनीही हे स्पष्ट केले. काही गोष्टी राजकारणात गोपनीय ठेवण्यात येतात. अजित पवार यांनी एक वक्तव्य केले, ते याच भावनेतून केले असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.