मुंबई: बेस्टच्या कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वानाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यात झालेल्या मातोश्रीवरील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. मात्र या निर्णयाला कामगार नेते शशांक राव यांनी विरोध केला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी बेस्ट कर्मचाऱ्यांनी केली होती. या मागणीच्या पूर्ततेसाठी कामगार नेते शशांक राव यांनीही बेमूदत उपोषण सुरू केले. मात्र त्यांना या बैठकीला बोलवण्यात आले नाही. त्यानंतर बेस्टची सूत्रं हलवण्यात आली आणि अखेर हा निर्णय घेण्यात आला. 


बेस्ट कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये वाढीव पगार दिला जाणार आहे. मात्र आम्हाला फसवी मध्यस्थी मान्य नसल्याचं शशांक राव यांनी सांगत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमच्या फॉर्म्युल्याप्रमाणे मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उपोषण असंच सुरू राहील असा निर्धार शशांक राव यांनी बोलून दाखवला आहे. सोबतच संपाचा निर्णय आम्ही कधीही घेऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. 


मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या मागणीला मान्यता मिळाली असली, तरी शशांक राव यांच्या नेतृत्वात सुरू असलेले उपोषण सुरूच आहे. राव यांच्या संघटनेने बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करून घ्यावा, बेस्ट कर्मचाऱ्यांना मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणेच दिवाळीचा बोनस आणि पगारासंदर्भातल्या इतर सुविधा मिळाव्यात, अशी मागणी लावून धरली आहे. जानेवारीत याच मागण्यासाठी नऊ दिवस बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता.