मोठी बातमी : मुंबईतील 72 % मशिदींनी स्वतःहून बंद केले भोंगे
मुंबईतील 72 % मशिदींवरील पहाटेचा भोंगा बंद करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील 72 % मशिदींवरील पहाटेचा भोंगा बंद झाले आहेत. मशिदींनी स्वतःहून भोंगे बंद केल्याची पोलिसांच्या सूत्रांची माहिती आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'लाऊडस्पीकर काढणे हे मुंबई पोलिसांचे काम नसून सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर तातडीने कारवाई करू. निवासी भागात ५५ डेसिबल, तर व्यावसायिक क्षेत्रात ६५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.'
राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली होती. राज ठाकरे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार असं स्पष्ट केलं आहे. राज्यात भोंग्यावरुन राजकारण तापलं असताना मुंबईतून ही मोठी बातमी समोर आली आहे.
मनसेकडून 3 मे रोजी राज्यभर महाआरतीचं नियोजन करण्यात आलं आहे. अक्षयतृतीयेला परवानगी घेऊन मनसेतर्फे हनुमानचालिसा, महाआरती करण्यात येणार आहे. अयोध्येला जाण्यासंदर्भात मनसेनं नियोजन सुरू केलं आहे.