'तुमच्या अहंकारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नको', भाजपचा सरकारवर निशाणा

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत युजीसीने गाईडलाईन्स दिल्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ पुन्हा वाढला आहे. 

Updated: Jul 8, 2020, 11:16 PM IST
'तुमच्या अहंकारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नको', भाजपचा सरकारवर निशाणा title=

मुंबई : अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत युजीसीने गाईडलाईन्स दिल्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ पुन्हा वाढला आहे. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर युजीसीने परीक्षांबाबतच्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या. यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत, असं पत्र केंद्रीय गृहमंत्री, मनुष्यबळ विकासमंत्री आणि युजीसीला पाठवलं आहे. यावरुन भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

'अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत युजीसीच्या गाईडलाईन्स आल्यानंतर ना सिनेटमध्ये चर्चा झाली, ना अकॅडमिक काऊन्सिलमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारने कुलगुरूंची मतही जाणून घेतली नाहीत. शिक्षण तज्ज्ञांशीही सल्लामसलत केली गेली नाही. कुलपती म्हणून राज्यपालांसोबतही बैठक झाली नाही,' अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. 

'थेट युजीसीला पत्र लिहून हात वर करून सरकार मोकळे झाले. त्यामुळे यात शैक्षणिक अधिष्ठान आहे का सरकारचा वैयक्तिक अहंकार? हाच अहंकार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं देशपातळीवर नुकसान करणारा ठरू नये. महाराष्ट्राचे विद्यार्थी देशपातळीवर मागे पडू नयेत,' असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.