)
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्र येऊन जागा वाटप केले आहे. मात्र काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट टक्कर होणार आहे. कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक २२५ हा असाच एक मतदारसंघ आहे, जिथे भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने येत आहेत. याला मैत्रीपूर्ण लढत म्हटले जातं. कारण युती असूनही स्थानिक पातळीवर स्पर्धा टाळता आली नाही. अशी लढत असलेला मुंबईतला पहिला असा सामना मानला जातोय.
भाजपने या वॉर्डात माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांना तिकीट दिले आहे. त्या यापूर्वी कुलाबा भागातून निवडून आल्या आहेत आणि स्थानिकांना परिचित आहेत. हर्षिता यांचा परिवार कुलाब्यात राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहे. कारण त्यांच्या नातेवाईकांनाही भाजपने जवळच्या वॉर्डमध्ये उमेदवारी दिली आहे. हर्षिता विकासकामे, स्वच्छता आणि भागातील सुशोभिकरण यावर भर देत प्रचार करत आहेत. त्यांचा अनुभव आणि पक्षाची ताकद यामुळे त्यांना मजबूत दावेदार मानले जाते.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी नगरसेविका सुजाता सानप यांना रिंगणात उतरवले आहे. सुजाता याही यापूर्वी या भागातून नगरसेविका होत्या आणि स्थानिक समस्या चांगल्या माहित आहेत. शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात कुलाबा मानला जातो. त्यामुळे सुजाता यांना पक्षाची पूर्ण ताकद मिळेल. त्या रहिवाशांच्या दैनंदिन समस्या, रस्ते, पाणी आणि सुरक्षा यावर बोलत आहेत. मराठी अस्मिता आणि शिवसेनेची पारंपरिक ताकद याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
कुलाब्यात नार्वेकर विरुद्ध सानप सामना खूप रंजक होणार आहे. दोन्ही उमेदवार माजी नगरसेविका असल्याने त्यांचा अनुभव समान आहे. युतीत असूनही ही स्पर्धा स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी टाळण्यासाठी किंवा मजबूत उमेदवार उतरवण्यासाठी असू शकते. कुलाबा हा दक्षिण मुंबईचा महत्त्वाचा भाग आहे. मतदारांना विकास आणि विश्वासू नेतृत्वाची अपेक्षा आहे, त्यामुळे ही लढत निकराची होईल.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कुटुंबात महापलिकेची 3 तिकीटं देण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या सगळ्यांच्याच नजरा उंचावल्या आहेत. भाजपने घराणेशाहीला विरोध करत स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा होती. असं असतानाराहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहिण गौरवी शिवलकर-नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील राजकारणात सक्रिय असलेल्या किंवा उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या 4 प्रमुख व्यक्ती आहेत. राहुल नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून पुन्हा निवडून आले आहेत ९ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.त्यांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे कुलाबा भागातील माजी नगरसेवक आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत त्यांना प्रभाग क्रमांक २२६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. मकरंद नार्वेकर यांच्या पत्नी आणि राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या देखील राजकारणात सक्रिय आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने त्यांना प्रभाग क्रमांक २२७ मधून उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हे राज्याच्या राजकारणातील एक मोठे नाव असून त्यांच्या कुटुंबाचा फलटण परिसरातील राजकारणात मोठा प्रभाव आहे.