बृहन्मुंबईमधील 'बृहन्’चा अर्थ काय? 99% मुंबईकरांना कल्पनाच नाही; तुम्हाला माहितीये का अर्थ?

BMC Election 2026 What Is Diffrence Between Mumbai and Brihanmumbai: तुम्ही अनेकदा महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून अधिकृत कागदपत्रांवरही 'बृहन्मुंबई' असा उल्लेख आढळतो. मात्र अनेकांना या शब्दाचा अर्थच माहिती नाही. त्याबद्दलच जाणून घेऊयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 15, 2026, 09:19 AM IST
बृहन्मुंबईमधील 'बृहन्’चा अर्थ काय? 99% मुंबईकरांना कल्पनाच नाही; तुम्हाला माहितीये का अर्थ?
तुम्हाला माहितीये का या शब्दाचा अर्थ?

BMC Election 2026 What Is Diffrence Between Mumbai and Brihanmumbai: मुंबईसहीत महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडत आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा, निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पक्षाचे कार्यकर्ते असा सारा मोहोल सध्या मुंबईसहीत अनेक बड्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मुंबई महापालिकेचा समावेश होतो. मात्र मुंबई महापालिकेचा उल्लेख करताना एक बाब तुमच्याही लक्षात आली असेल की महापालिकेचं मुख्य कार्यालय असो किंवा कागदपत्रांवरील उल्लेख असो तिथे 'बृहन्मुंबई' हा शब्द वापरलेला जातो. या शब्दाचा नेमका अर्थ काय? हा शब्द का वापरला जातो? असा प्रश्न अनेकदा पडतो. याबद्दलच जाणून घेऊयात...

Add Zee News as a Preferred Source

फरक फारच मोठा

'बृहन्मुंबई' आणि 'मुंबई'मध्ये एका शब्दाचा फरक दिसत असला तरी मुख्यतः प्रशासकीय आणि भौगोलिक व्याप्तीचा विचार केला तर दोन्हींमध्ये फार मोठा फरक असल्याचं स्पष्ट होतं. मुंबई हे सामान्यतः मुंबई शहर जिल्ह्याबद्दल वापरलं जातं. हा परिसर दक्षिण मुंबई किंवा आयलंड सिटी म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये मुख्यतः कोलाबा ते माहीमपर्यंतचा भाग येतो. हे मुंबईचे मूळ भाग आहेत. या भागातील लोकसंख्या सुमारे 30 लाखांपर्यंत आहे आणि क्षेत्रफळ 67.79 चौ. कि.मी. आहे. 1990 पर्यंत मुंबई हा एकच जिल्हा होता. मात्र नंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात विभागण्यात आलं. 

बृहन्मुंबई म्हणजे काय?

आता बृहन्मुंबई (Brihanmumbai) म्हणजे काय हे समजून घेऊयात. बृहन्मुंबईला 'ग्रेटर मुंबई' किंवा 'मोठी मुंबई' असं मराठीत म्हणता येईल.  'बृहत्' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'मोठा' किंवा 'विस्तारित' असा होतो. म्हणजेच मूळ मुंबई वगळता जो विस्तारीत भाग विचारात घेऊन मुंबईच्या सीमा निश्चित करण्यात आला आहे तो सर्व परिसर बृहन्मुंबईमध्ये येतो. हे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणारे संपूर्ण क्षेत्र मानले जाते. यामध्ये मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश होतो. मुंबई उपनगर जिल्हा हा माहीम ते दहिसर (पश्चिम) आणि सायन ते मुलुंड (पूर्व) पर्यंत पसरलेला आहे, ज्यात बांद्रा, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर यासारखी उपनगरे येतात. हे क्षेत्र 369 चौ. कि.मी. आहे आणि लोकसंख्या सुमारे 93 लाख आहे.

यापेक्षाही मोठा भाग एमएमआरचा

रोजच्या बोलण्यात 'मुंबई' असा उल्लेख असतो त्यामध्ये बृहन्मुंबई अपेक्षित असते. मात्र अधिकृतपणे बृहन्मुंबई हे मुंबई महापालिकेचे कार्यक्षेत्र अधोरेखित करण्यासाठी वापरलं जातं. बृहन्मुंबईपेक्षा मोठा भाग हा मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) आहे. यामध्ये बृहन्मुंबई व्यतिरिक्त ठाणे, नवी मुंबई, कल्याण, पनवेल यासारख्या भागांचा समावेश होतो. एमएमआरमधील एकूण 9 शहरांमधील महापालिकांची निवडणुकही आजच पार पडत आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More