मुंबई महापालिकेची बेवारस वाहनांवर धडक कारवाई, करणार वाहनांचा लिलाव
मुंबई महापालिकेनं रस्त्यावरील बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्याचं ठरवलं आहे. याचा वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेनं रस्त्यावरील बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्याचं ठरवलं आहे. याचा वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.
बेवारस वाहने उचलून नेणार
रस्त्यावर बेवारस वाहने उभी असल्याचं आढळल्यास २ दिवसात मुंबई महापालिका ती उचलून नेणार आहे. त्यानंतर 30 दिवसांत दंड भरून वाहनमालकानं वाहनं नेलं नाही तर मुंबई महापालिका त्या वाहनांचा लिलाव करणार आहे.
यासाठी हा निर्णय
वाहतुकीस अडथळा होऊ नये तसंच बंद वाहनांमध्ये पाणी जमा होऊन डासांची उत्पती होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
लिलावातून ९६ लाख रूपये
ऑगस्ट २०१७ मध्ये अशाप्रकारे २ हजार ७४७ वाहनांच्या लिलावातून महापालिकेला सुमारे ९६ लाख रूपये मिळाले. तर दंडापोटी १ कोटी ६८ लाख रूपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झालीय.
बेवारस वाहनाची तक्रार इथे करा
दरम्यान, बेवारस वाहन आढळल्यास १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करा किंवा महापालिकेच्या www.mcgm.gov.in अथवा portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.