Charu Khandal Insurance Case: अभिनेता शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या निर्मिती कंपनीत काम करणाऱ्या एका 28 वर्षीय महिला कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आता या कुटुंबाला 62 लाखांची भरपाईला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून न्यायालयाने नुकतीच या भरपाईसाठी मान्यता दिली आहे. ही महिला कर्मचारी भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाली होती आणि चार वर्षांनंतर तिचा मृत्यू झाला. याच प्रकरणात न्यायालयाने निर्णय देत मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला दिलासा दिला आहे. पैशाने जीवितहानी भरून काढता येऊ शकत नाही. परंतु, झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपघातग्रस्तांना परिपूर्ण भरपाई मिळणे अशक्य आहे. मात्र, योग्य भरपाई हे सर्वसामान्य प्रमाण असले पाहिजे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबत मोटार वाहन अपघात दावा न्यायाधिकारणाने नोव्हेंबर 2020 मध्ये दिलेल्या आदेशात कोणतीही विकृती, बेकायदेशीरपणा किंवा अनियमितता आढळून आलेली नाही. त्यामुळे, न्यायाधिकरणाचा आदेश रद्द करू शकत नाही, असे नमूद करीत न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायामूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने न्यायाधिकणाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मोटार वाहन कायदा अपघातग्रस्त किंवा अपघातात मृत्यू पडलेल्यांना भरपाईचे लाभ देण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. त्याकडे, तसेच घटनेने नागरिकांना सन्मानाने निरोगी जीवन जगण्याच्या दिलेल्या अधिकाराच्या उल्लंघनाकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही, असेही न्यायालयाने आदेशान नमूद केले.
खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. या प्रकरणी देखील शाहरूख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या निर्मिती कंपनीत अॅनिमेटर म्हणून काम करणाऱ्या चारू खंडाल हिच्या कुटुंबीयांना किमान न्याय देता यावा यासाठी 62 लाख रुपयांच्या भरपाईला मान्यता देणे योग्य ठरेल, असेही न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती सेठना यांच्या खंडपीठाने अधोरेखीत केले.
शाहरूख खानच्या 'रा.वन' चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर काम करणाऱ्या चारू खंडालचा 2017 मध्ये मृत्यू झाला. त्याआधी म्हणजे मार्च 2012 मध्ये चारू खंडाल ही चित्रपटासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीतून रिक्षाने घरी परतत होती. त्यावेळी, एका भरधाव कारने तिच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात चारू खंडाल हिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने तिला मानेच्या खाली अर्धांगवायू झाला होता. न्यायाधिकरणाने चारू खंडाल हिच्या कुटुंबीयाना मंजूर केलेल्या भरपाईच्या आदेशाला 'चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स' कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अपघातानंतर चारू खंडालच्या कुटुंबाने जून 2014 मध्ये मोटार अपघात दावा न्यायाधिकरणासमोर भरपाईसाठी दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाने नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांना 62 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली होती. उच्च न्यायालयाने चारु खंडालच्या कुटुंबीयांना दिलासा देताना कंपनीची याचिका फेटाळून लावली.
चारू खंडाल हिचा मृत्यू हा तिला अपघातात झालेल्या दुखापतींमुळे झाला नाही. किंबहुना, अपघातानंतर चार वर्षांहून अधिक काळाने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे, तिला झालेला अपघात आणि तिचा मृत्यू यांचा संबंध नाही, असा दावा विमा कंपनीने अपिलात केला होता. तसेच, चारू खंडाल हिचा मृत्यू अपघातात तिला झालेल्या दुखापतींमुळे झाल्याचा न्यायाधिकरणाने तिच्या कुटुंबीयांना भरपाई मंजूर करताना काढलेला निष्कर्ष चुकीचा होता, असा दावाही कंपनीने केला होता.
अशा प्रकरणांत विमा कंपनी अति-तांत्रिक दृष्टिकोन बाळगू शकत नाही आणि पीडितेच्या कुटुंबाला कायदेशीररित्या पात्र असलेल्या विमा योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाने कंपनीचा युक्तिवाद फेटाळला. तसेच, चारू खंडाल हिला अपघातात झालेल्या दुखापतींमुळे तिला संसर्ग होऊन नंतर त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा न्यायाधिकारणाने काढलेला निष्कर्ष योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. चारू खंडाल हिच्या उपचारांसाठी 18 लाख रुपये खर्च झाले. पक्षाघात झालेल्या चारू खंडाल हिला अपघातानंतरच्या काळात एका परिचारिकेची आणि फिजिओथेरपी सत्रांची आवश्यकता होती, असेही न्यायाधिकारणाने भरपाई मंजूर करताना म्हटले होते. तो निष्कर्षही चुकीचा नसल्याचे न्यायालयाने नमूद करत कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 161/9
|
VS |
USA
132/8(20 ov)
|
| India beat USA by 29 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 182/5
|
VS |
SCO
147(18.5 ov)
|
| West Indies beat Scotland by 35 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NED
(19.5 ov) 147
|
VS |
PAK
148/7(19.3 ov)
|
| Pakistan beat Netherlands by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.