Google Map वर विश्वास ठेवून पस्तावली, महिला कारसकट थेट बेलापूरच्या खाडीत, पुढे जे झालं...'

Car falls into the Belapur creek: गुगल मॅपच्या चुकीच्या दिशानिर्देशामुळे एक धक्कादायक अपघात घडला.

प्रविण दाभोळकर | Updated: Jul 26, 2025, 10:39 AM IST
Google Map वर विश्वास ठेवून पस्तावली, महिला कारसकट थेट बेलापूरच्या खाडीत, पुढे जे झालं...'
बेलापूर खाडी

Car falls into the Belapur creek: आजकाल आपण कोणतही काम लवकर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात काही गैर नाही पण तंत्रज्ञानावर विसंबून राहिल्याने आपली कशी फजिती होऊ शकते? याची प्रचिती एका महिलेला आलीय. गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच शुक्रवारी पहाटे 1 वाजता नवी मुंबईतील बेलापूर येथील खाडीत कार बुडाल्याचा एक विचित्र प्रकार समोर आला. कशी घडली नेमकी ही घटना? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

काय घडली नेमकी घटना?

गुगल मॅपच्या चुकीच्या दिशानिर्देशामुळे एक धक्कादायक अपघात घडला. उलवे येथे जाण्यासाठी कार चालवणारी एक महिला गुगल मॅपच्या आधारे वाट पाहत होती. मात्र, बेलापूर खाडीपुलावर जाण्याऐवजी तिने चुकीच्या मार्गाचा अवलंब केला. ज्यामुळे तिची कार थेट खाडीत कोसळली. सुदैवाने, सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण वाचले. महिला उलवेच्या दिशेने कारने निघाली होती आणि गुगल मॅपच्या दिशानिर्देशांवर अवलंबून होती. बेलापूर येथील खाडीपुलाखालील मार्ग निवडताना तिला गुगल मॅपवर सरळ रस्ता दिसला. प्रत्यक्षात, हा रस्ता ध्रुवतारा जेट्टीवर संपला, जिथे कोणताही सुरक्षा कठडा नव्हता. परिणामी, कार थेट खाडीत कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कार पाण्यात वाहत जाऊ लागली.

सागरी पोलिसांनी कशी दाखवली तत्परता?

हा प्रकार जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या नजरेस आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने महिलेला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. यानंतर, क्रेनच्या मदतीने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली. सागरी सुरक्षा पोलिस चौकीच्या समोरच हा अपघात घडल्याने तात्काळ मदत मिळाली, ज्यामुळे महिलेचा जीव वाचला.

अपघातानंतर महिला काय म्हणाली?

'मी गुगल मॅपवर रस्ता पाहत होती, पण रस्ता संपून पुढे जेट्टी आहे हे मॅपवर दिसले नाही. यामुळे ती चुकीच्या दिशेने गेली आणि हा अपघात घडला. गुगल मॅपच्या दिशानिर्देशांवर पूर्णपणे अवलंबून राहिल्याने तिला रस्त्याची खरी परिस्थिती समजली नसल्याचे'महिलेने पोलिसांना सांगितले.

गुगल मॅपमुळे वाढत्या अपघातांची चिंता

गुगल मॅप किंवा इतर नेव्हिगेशन अॅप्सवर अवलंबून राहिल्याने देशभरात अशा अपघातांच्या घटना वाढत आहेत. यापूर्वीही अनेक ठिकाणी चुकीच्या दिशानिर्देशांमुळे वाहने खड्ड्यात, नदीत किंवा असुरक्षित मार्गांवर गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बेलापूरच्या या घटनेने पुन्हा एकदा नेव्हिगेशन अॅप्सच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जेट्टीवर सुरक्षा कठडा असता तर? 

ध्रुवतारा जेट्टीवर सुरक्षा कठड्यांचा अभाव हा देखील या अपघाताचे एक प्रमुख कारण ठरला. स्थानिक प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षा कठडे बसवणे, तसेच रस्त्याच्या शेवटी चेतावणी फलक लावणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील.

पोलिसांचे कौतुक

सागरी सुरक्षा पोलिसांच्या तत्परतेमुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी टळली. त्यांच्या जलद प्रतिसादामुळे महिलेला वेळीच मदत मिळाली. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या कृतीचे कौतुक केले आहे.

मानवी सतर्कता किती महत्वाची?

या घटनेमुळे वाहनचालकांना गुगल मॅप किंवा इतर नेव्हिगेशन अॅप्स वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः अपरिचित किंवा धोकादायक मार्गांवर प्रवास करताना मॅप्सच्या दिशानिर्देशांवर पूर्णपणे अवलंबून न राहता आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानावर अवलंबून राहताना मानवी सतर्कता आणि स्थानिक परिस्थितीची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे या घटनेतून पाहायला मिळते.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More