कारमध्ये लपून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसला तरुण, पुढे जे झालं

Salman Khan News: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: May 22, 2025, 07:16 PM IST
कारमध्ये लपून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसला तरुण, पुढे जे झालं
सलमान खान

Salman Khan Galaxy Apartment:  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी एक तरुण घुसून त्याने त्याच्यावर हल्ला केल्याची घटना काही दिवासंपुर्वी समोर आली होती. यानंतर मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान याच्या काही दिवसातच असाच प्रकार सलमान खानच्या बाबतीत घडलाय. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. काय घडली नेमकी घटना? सविस्तर जाणून घेऊया.

गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचला

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 20 मे रोजी घडल्याचे सांगितले जातंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव जितेंद्र कुमार असून तो छत्तीसगडचा रहिवासी आहे. सुरक्षा रक्षकांपासून वाचण्यासाठी तो कारमध्ये लपून अपार्टमेंटमध्ये घुसला. 23 वर्षीय जितेंद्र कुमार सलमान खानला भेटण्यासाठी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले

छत्तीसगडमधील एका तरुणाने गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, 20 मे रोजी संध्याकाळी जितेंद्र कुमार नावाच्या एका तरुणाने सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तो सलमान खानला भेटण्यासाठी आला होता असे सांगितले जातंय. सुरक्षेपासून वाचण्यासाठी त्याने कोणाच्या तरी गाडीमागे लपून इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच पकडले.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

सुरक्षेच्या कारणास्तव अभिनेता सलमान खानला आधीच पोलीस संरक्षण आहे. असे असूनही आरोपी तरुणाने सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले आणि पोलीस आणि रक्षकांची नजर चुकवून जबरदस्तीने अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.