लिफ्टमधील मुलांचा खेळ जिवावर बेतण्याची भीती

इमारतीत एका मजल्यावरुन दुस-या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर होतो. पण या लिफ्टमध्ये लहान मुलं खेळण्याचा जीवघेणा प्रकार वाढलाय. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 6, 2025, 08:05 PM IST
लिफ्टमधील मुलांचा खेळ जिवावर बेतण्याची भीती

इमारतीत एका मजल्यावरुन दुस-या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर होतो. पण या लिफ्टमध्ये लहान मुलं खेळण्याचा जीवघेणा प्रकार वाढलाय. गेल्या काही दिवसांपासून लिफ्टमध्ये लहान मुलांचे अपघात वाढलेत. लहान मुलं लिफ्टमध्ये खेळतात आणि हा खेळ त्यांच्या आयुष्याचा शेवट करतो. तुमच्याही इमारतीत लिफ्ट असेल आणि मुलं खेळत असतील तर राहा खबरदार.

Add Zee News as a Preferred Source

महानगरं आणि निमशहरी भागात बहुमजली इमारती उभ्या राहिल्यात. बहुमजली इमारतींना लिफ्ट लावलेली पाहायला मिळते. सध्या जिन्यांवरुन चालत जाण्याऐवजी लिफ्टला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळं शहरी भागात नवीन फ्लॅट विकत घेणारे इमारतीत लिफ्ट आहे का याची विचारणा करतात. अगदी पहिल्या माळ्यावरचा माणूसही लिफ्टचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो..लिफ्टही सामान्य माणसाची गरज झालेली असताना, हीच लिफ्ट लहान मुलांसाठी जीवघेणी ठरु लागलीये. लिफ्टमध्ये खेळताना अनेक अपघात झाल्याची उदाहरणं आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये लिफ्टमध्ये खेळणा-या एका मुलाचा हकनाक जीव गेला आहे. लिफ्ट काही क्षणात एका माळ्यावरुन दुस-या माळ्यावर नेते. ही बाब मुलांना लिफ्टकडं आकर्षित करु लागलीये. लिफ्टमध्ये खेळण्याकडं मुलांचा कल दिसतोय. लिफ्टमन नसलेल्या सोसायटीत मुलं लिफ्टमधून वरखाली खेळताना दिसतात. दुपारच्या वेळेत तर लिफ्टमध्ये खेळणं हा मुलांचा जणू छंद झाल्यासारखी स्थिती आहे. हाच खेळ मुलांच्या जिवावर उठलाय. लिफ्टमध्ये खेळताना मुलांसोबत अनेक अपघात घडू लागले आहेत. कोवळी मुलं अजाणतेपणी स्वतःच्या जीवाशी खेळू लागली आहेत. 

मुख्य बाब म्हणजे लिफ्ट हे खेळण्याचं ठिकाण नाही. त्यामुळं मुलांना शक्यतो लिफ्टच्या ठिकाणी खेळायलाच जाऊ देऊ नये... लिफ्ट वापरण्यासाठी सोसायटीत काही नियम घालून देण्याची गरज निर्माण झालीय

महत्त्वाचे मुद्दे 

लिफ्टमध्ये शक्यतो लिफ्टमन ठेवा
लहान मुलांना एकट्यानं लिफ्टने जाऊ देऊ नका
लिफ्टजवळ मुलांना खेळण्यास मनाई करा
लिफ्टची बटणं मुलांना दाबू देऊ नका
लिफ्ट सुरु झाल्यावर दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करु नका

लिफ्ट इमारतीत एका मजल्यावरुन दुस-या मजल्यावर जाणारं साधन असलं तरी ती मुलांसाठी धोकायदायक ठरु लागली आहे. लिफ्टमधील अपघात हे सगळ्याच वेळी निष्काळजीपणामुळं होतात असं नाही. लिफ्टची देखभाल करणं अतिशय गरजेचं असतं. लिफ्टची देखभाल ठेवली नाही तर लिफ्ट धोकादायक ठरु शकते. अनेकवेळा त्यामुळंच अपघात होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

लिफ्ट हे खेळणं नाही. त्यामुळं लिफ्टचा खेळण्यासारखा वापर करुच नका. लिफ्ट नेहमी अद्यावत ठेवा... शिवाय लिफ्टमध्ये लिफ्टमन ठेवाच.  खासगी लिफ्ट असेल तर मुलांना एकट्याने लिफ्टमधून जाऊ देऊ नका. लिफ्टचा वापर अतिशय सावधगिरी बाळगून करा. नाहीतर तुमच्या जवळच्या प्रिय व्यक्तींना गमावण्याची वेळ तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळं राहा खबरदार. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More