CIDCO Lottery : मागील काही वर्षांमध्ये मुंबईच्या मुख्य शहरासोबतच शहराला लागून असणाऱ्या उपनगरांचाही मोठ्या झपाट्यानं विकास झाल्याचं पाहायला मिळालं. शहराच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि तसतशी वस्तीही वाढली, गृहनिर्माणसंस्थांचं एक जाळं या उपनगरांमध्येही विस्तारताना दिसलं. इथं मुंबईत घरांच्या किंमतींनी आभाळ गाठलेलं असतानाच तिथं आता अनेकांचाच कल पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई आणि नजीकच्या भागांकडेही पाहायला मिळत आहे. अशाच घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी आणि त्याहूनही सिडकोच्या लॉटरीसंतर्भातील ही महत्त्वाची अपडेट.
सिडकोनं काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या गृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत आता 11 डिसेंबरला संपत असली तरीही येत्या काळात मात्र सिडको या घरांसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात मुदतवाढ देण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
पुरेसा सूर्यप्रकाश, सामान्यांच्या अपेक्षेप्रमाणं घरांचं क्षेत्रफळ अशा या घरांच्या किमती सिडकोनं अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. परिणामी सध्या या घरांसाठी ऑनलाईन पद्धतीनं 105942 अर्जदारांनी अर्ज केले असले तरीही अनेक इच्छुक मात्र संभ्रमात आहेत. त्यामुळं येत्या काळात या लॉटरीसाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महारेराच्या परवानगीनंतर सिडकोनं नवी मुंबईतील तळोजा, खारघर या आणि अशा विविध नोडमध्ये 27 ठिकाणांवर 67 हजार घरांच्या उभारणीचं काम हाती घेतलं. ज्यापैकी 43 हजार घरांना महारेराची अंतिम परवानगी मिळाली. त्यातल्याच 26 हजार घरांसाठीची सोडत सिडकोनं ऑक्टोबर महिन्यात सुरू केली. पण, दरम्यानच्या काळातील निवडणूक प्रक्रिया आणि त्यामुळं अर्जदारांना या सोडतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत कर्ता न आल्यामुळं आणि सिडकोकडूनच अद्यापही या घरांच्या अधिकृत किमती जाहीर न करण्यात आल्यामुळं काही इच्छुकांनी घरांसाठीचे अर्ज केले नाहीत. अर्जदारांचा अल्प प्रतिसाद पाहता सिडको मुदतवाढीसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकते. तेव्हा आता हा निर्णय नेमका केव्हा घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल.