मुंबई विमानतळावर 15 कोटींचे कोकेन जप्त; डीआरआयची मोठी कारवाई
Mumbai News : महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 15 कोटी रुपयांचे कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे.
Mumbai Crime : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर एक मोठी कारवाई केली आहे. डीआरआयने (DRI) अमली पदार्थांच्या तस्करीच्या कारवाईत सहभागी असलेल्या व्यक्तीला यशस्वीरित्या पकडले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने कारवाई करत तब्बल 15 कोटी रुपयांचे कोकेन (Cocaine) जप्त करत एकाला ताब्यात घेतलं आहे. इथोपियाच्या आदिस अबाबा येथून आलेल्या एका भारतीय व्यक्तीला मुंबई विमानतळावर (Mumbai airport) ताब्यात घेत त्याच्यांकडून तब्बल 1496 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे ज्याचे बाजार मूल्य अंदाजे 15 कोटी रुपये आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी या व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्याकडे कोकेन सापडले आहे. या कोकेनची किंमत जवळपास 15 कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक नियोजन करत ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. हे ड्रग्ज युगांडा इथल्या एका महिलेला द्यायचे होते अशी माहिती पकडलेल्या व्यक्तीने दिली आहे. सध्या ही महिला वाशी नवी मुंबई येथे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी तिलाही अटक केली आहे.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ड्रग्जची वाहतूक करणारी व्यक्ती आणि प्राप्तकर्ता या दोघांनाही एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदींनुसार अटक केली आहे. त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच या ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. तसेच कल्याण शहरात गुन्हेगारी आरोपांचा सामना करत असलेल्या एका व्यक्तीला कठोर महाराष्ट्र प्रतिबंधक क्रियाकलाप (एमपीडीए) कायद्याच्या तरतुदीनुसार ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहितीसुद्धा एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
दरम्यान, शनिवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मौल्यवान वस्तूंची तस्करी करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल तीन कोटी 20 लाखांपेक्षा जास्त किमतीचे 6.19 किलो सोने आणि तीन महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.