मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत अनेक रंजक घडामोडी सुरु आहेत. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी काहीवेळापूर्वीच 'सामना'च्या कार्यालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर हुसेन दलवाई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यात भाजपचे सरकार येणार नाही. हीच काँग्रेसची इच्छा आहे, असे दलवाई यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का, याविषयी पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक झाली होती. मात्र, संख्याबळाचा निश्चित अंदाज नसल्याने काँग्रेस द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, दलवाई आणि राऊत यांच्यातील भेटीनंतर वारे पुन्हा वेगळ्या दिशेला वाहू लागले आहेत. आज संध्याकाळी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस नेतृत्त्वाकडून हुसेन दलवाई यांच्यामार्फत शिवसेनेला निरोप पाठवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता आणखी काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेश झाला असून सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला पाठिंबा द्या, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याचीही आठवण दलवाई यांनी पत्रात करून दिली होती.


आम्ही शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होण्याची वाट पाहतोय- शरद पवार


शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राज्यातील पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध केला आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, या मताचे आहेत.