काँग्रेस - राष्ट्रवादीची आगामी निडवणूक आघाडीसाठी बैठक
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. जागा वाटपावरुन तिढा असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दमरम्यान, भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. बैठकीत दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.काँग्रेसकडून खासदार अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम, शरद रणपिसे, नसीम खान, विजय वडेट्टीवार तर राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर आदी नेते बैठकीला उपस्थित आहेत.
२००९ च्या निवडणुकीतील जागा वाटप कायम रहावे ही काँग्रेसची भूमिका आहे. तर जागा वाढवून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 50 टक्के जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार का की कायम राहणार याकडे लक्ष लागलेय.