धारावी नाही, तर मुंबईचा हा भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये सुरुवातीला कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत होते.
मुंबई : आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये सुरुवातीला कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत होते. धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता, पण प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी करत धारावीतील कोरोना आटोक्यात आणला, पण आता मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेलं अंधेरी कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. अंधेरीमध्ये सध्या धारावीपेक्षाही जास्त कोरोनाचे रुग्ण आहे.
मुंबई महापालिकेच्या २१ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार धारावीमध्ये एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४,४४३ एवढी होती तर एकट्या अंधेरी पूर्वमध्ये कोरोनाचे ४,६६३ रुग्ण आहेत. कोरोनाचे जास्त रुग्ण असल्यामुळे अंधेरीच्या वस्त्यांमध्ये अजूनही फक्त अत्यावश्यक सेवा देणारीच दुकानं सुरू आहेत. या भागातली अनेक घरं खाली आहेत, कारण मजूर आपल्या कुटुंबाला घेऊन गावाला गेले आहेत.
मागच्या ३० वर्षांमध्ये या भागाची एवढी भयावह परिस्थिती पाहिली नाही, असं इथले स्थानिक नागरिक असलेले हेमंत शिंदे सांगतात.
धारावीप्रमाणेच कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने या भागात मिशन झिरो लॉन्च केलं आहे. या मिशनमध्ये डॉक्टर आणि स्वयंसेवकांची टीम ५० मोबाईल डिस्पेन्सरी घेऊन प्रत्येक घरी जाऊन लोकांची चाचणी करणार आहे.
'धारावीपासून आम्ही शिकलो आहोत, त्यामुळे रॅपिड एक्शन प्लान बनवून ५० डिस्पेन्सरी व्हॅन देण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरज पडली तर आणखी सुविधा आम्ही देऊ,' अशी प्रतिक्रिया बी.जे.एस.चे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी दिली.