Corona : मुंबई लोकललाही ब्रेक; आज मध्यरात्रीपासून `लाईफलाईन` बंद
`या` दिवसापर्यंत नाही धावणार लोकल
मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई लोकललाही ब्रेक लागणार आहे.
प्रशासनाने वारंवार सुचना करुनही रेल्वेमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या प्रमाणामुळे कोरोनाची लागण होण्याची वाढती शक्यता पाहता अखेर प्रशासनाला मुंबई लोकल थांबवण्याचा हा निर्णय घ्यावा लागला आहे. मुंबईची लोकल सेवा जवळपास ३१ मार्चपर्यंच बंद राहणार आहे. तर, मालवाहतूक काही महत्त्वाच्या कारणांमुळे सुरु ठेवण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला प्रवासासाठी निघालेले सर्व प्रवासी इच्छित स्थळी पोहोचतील याची दखलही रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात येत आहे.
रात्री बारा वाजल्यानंतर मुंबईची लोकलसेवा पूर्णपणे ठप्प होणार असल्यामुळे नागरिकांनी किमान आततरी परिस्थितीचं गांभीर्य घेत कोरोनाला रोखण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन करण्याच येत आहे. दरम्यान नागरिकांची गर्दी कमी करण्यात यश न मिळाल्यास नाईलाजाना शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
देशभरातील रेल्वे सेवाही ३१ मार्चपर्यंत ठप्प
देशात कोरोना विषाणूचा धोका पाहता भारतीय रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय़ घेतला गेला. ३१ मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत प्रवास पूर्ण झालेल्या गाड्या त्वरित थांबवण्यात येतील. सध्या 400 मालगाड्या धावत आहेत आणि या रेव्ले गाड्या ठरलेल्या स्थानकावर पोहोचल्यानंतर ते बंद केल्या जातील. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.