Dadar Hanuman Temple : गेल्या बऱ्याच काळापासून राम मंदिर हा राजकारणाचा मुद्दा ठरला होता. तर आता राममंदिरानंतर दादरच्या हनुमान मंदिरावरुन राजकारण सुरू झालंय. दादरमधील या 80 वर्ष जुनं मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरु असतांनाच ठाकरेंनी हनुमान मंदिराचा मुद्दा लावून धरलाय. तर गेल्या 5 वर्षांमध्ये राममंदिर हा राजकारणाचा केंद्रबिंदु ठरत होता.
मविआ सरकारच्या काळात हनुमान चालिसा म्हणत भाजपनं ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आता महायुतीची सत्ता येताच ठाकरेंनीही भाजपला हनुमानावरून कोंडीत पकडलंय. दादर येथील पुरातन हनुमान मंदिराला रेल्वेनं नोटीस बजावल्यावरून भाजप आणि ठाकरेंमध्ये घमासान सुरू झालंय.
दादर रेल्वेस्थानकातल्या 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिरावरुन सध्या राजकीय रामायण सुरू झालंय. हे हनुमान मंदिर अवैधरित्या बांधल्याचा ठपका ठेवत सुरुवातीला रेल्वे प्रशासनानं नोटीस बजावली. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटानं रान उठवलं. आदित्य ठाकरेंनी थेट त्या मंदिरात जाऊन आरती करत भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान, हनुमान मंदिरात महाआरतीची सुरुवात बाळासाहेब ठाकरेंनी केल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे हनुमान मंदिराला हात लावता येणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला
शिवसेना ठाकरे पक्षानं हनुमान मंदिराचा मुद्दा लावून धरल्यावर भाजपचे नेतेही पुढे सरसावले. "भाजपा मुंबई शहर अध्यक्ष आशीष शेलार, विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या संपर्कात होते. अधिकाऱ्यांना भेटून सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार, मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे”, असं माजी मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.भाजप आमदार मंगल प्रभात लोढा, भाजपच्या नवनीत राणांचे पती आमदार रवी राणांनी देखील हनुमान मंदिरात जाऊन आरती केली आणि नोटीशीवर स्थगिती आणल्याचा निर्वाळा दिला.
त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे आरतीसाठी हनुमान मंदिरात गेले. मात्र, सोमय्या येताच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला. शिवसैनिकांचा वाढता विरोध बघता रेल्वे प्रशासनानं दिलेल्या स्थगितीच्या पत्रावर मंदिर विश्वस्तांनी संशय व्यक्त केलाय. आपल्याला व्हॉटसअपवर हस्तलिखीत पत्र दाखवण्यात आलं.
या सगळ्या प्रकरणावर मंदिराचे विश्वस्त प्रकाश कारखानीस यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'आम्हाला अजून पत्र मिळालेलं नाही. आम्हाला कायमस्वरुपी स्थगिती हवी.'