अन् वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू... मुलींचं बापाला अनोखं गिफ्ट

माझी मुलगी माझा अभिमान, हे आता बोलण्यापुरतं उरलेलं नाही. कारण त्या मुलींनीच स्वत:ला सिद्ध केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 4, 2025, 09:42 PM IST
अन् वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू... मुलींचं बापाला अनोखं गिफ्ट

प्रथमेश तावडे, झी 24 तास, मुंबई : मुलं कितीही मोठी असली तरी आई वडिलांसाठी लहान असतात.. मोठं झाल्यावरही आपल्याला हवं नको ते पाहतात..  या धावपळीत त्यांची स्वप्नं अपूर्ण राहतात.. मात्र तेच स्वप्न जेव्हा मुलं पूर्ण करतात.. खासकरून जेव्हा मुली वडिलांचं स्वप्न साकारतात तेव्हा तर ती भेट खास ठरत आहे 

Add Zee News as a Preferred Source

वडिलांच्या डोळ्यांतले हे अश्रू सगळंच सांगून जात आहेत. त्यांना झालेला हा आनंद बुलेट मिळाल्याचा नाही तर ती बुलेट आपल्या मुलींनी भेट म्हणून दिल्याचा आहे. नायगावच्या भाऊसाहेब दिघेंचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहे. ज्या वडिलांनी आयुष्यभर आपल्याला हवं नको ते दिलं आपल्या शिक्षणासाठी मेहनत केली. स्वत:च्या अनेक गोष्टींना मुरड घातली... स्वत:चं बुलेट घेण्याचं स्वप्न पुढे ढकललं. तीच बुलेट भेट म्हणून देत मुलींनी वडिलांना सुखद धक्का दिला. यात बुलेटपेक्षा मुलीनं मेहनत करून पैसे साठवून बुलेट दिल्याचा त्यांना मोठं समाधान आहे.. 

माझी मुलगी माझा अभिमान, हे आता बोलण्यापुरतं उरलेलं नाही. कारण त्या मुलींनीच स्वत:ला सिद्ध केलं आहे. ज्या आई वडिलांच्या पोटी आपला जन्म झाला.. त्यांनी कष्ट करून शिकवलं. आपल्या पंखात बळ भरलं. परदेशात शिकायला पाठवलं.. त्यांचे उतराई आपण होऊ शकत नाहीच पण किमान त्यांच्या चेह-यावर हास्य नक्कीच आणू शकतो. यासाठी मानसीनं ऑस्ट्रेलियात दोन ठिकाणी जॉब करत पैसे साठवले आणि पप्पांचं बुलेटचं स्वप्न साकारलं.

मुली म्हणजे पापा की परी.. परक्याचं धन.. किंवा आणखी काही टोमणे मारणा-यांच्या डोळ्यात या मुलींनी अंजन घातलं आहे. या उंचीपर्यंत त्या मुली पोहोचल्या याच श्रेयही त्यांच्या आईवडिलांना द्यावं लागेल.. कारण जेव्हा तुम्हाला मुलीचं का? मुलगा नाही? मुलींच्या शिक्षणासाठी काय खर्च करतोस...? अशा अनेक टोमणेवजा प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष करून मुलींना शिकवलं आणि परदेशी पाठवलं. वडिलांची हीच जिद्द, मेहनती वृत्ती मुलींनी घेतली आणि पुढे जाऊन वडिलांचं स्वप्न साकार केलं.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More