दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. भाजप नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे पीपीई किट आणि टेस्टिंग किटची मागणी केली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स आणि औषधं यायला हवीत, पण मागणीच्या ३० टक्केही पुरवठा होत नाही. खरंतर आपल्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रात गेलं पाहिजे आणि आम्हाला पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स द्या, अशी मागणी केली पाहिजे. आमच्या हक्काचा जो पैसा आहे तो जीएसटीचा परतावा आणि वेगवेगळ्या योजनांचे पैसे आम्हाला द्या, यासाठी केंद्राकडे जाऊन भांडलं पाहिजे. त्याऐवजी राज्याच्या कामकाजात अडचण होईल, असा त्यांचा प्रयत्न असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. 


मागच्या दीड-दोन महिन्यात चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते कुठे दिसले नाहीत. आता तापलेल्या वातावरणात आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल, यासाठी चंद्रकांतदादा बाहेर पडायला लागल्याची टीका थोरात यांनी केली. 


परराज्यातील ५० लाख मजूर आम्ही सांभाळत आहोत. त्यांच्या रेल्वेचा खर्च आधी काँग्रेसने केला, आता राज्य सरकार करत आहे. त्यासाठी १०० कोटी रुपये आम्ही ठेवले. रेल्वेने तर जादा तिकीट दर आकारला. केंद्र सरकारने राज्याला भरीव पॅकेज दिलं पाहिजे, यासाठी विरोधकांनी केंद्र सरकारकडे जाऊन भांडलं पाहिजे, अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. 


ही आंदोलनाची वेळ नाही उलट जनतेला धीर दिला पाहिजे. अशावेळी संपूर्ण राज्यात गोंधळाचं वातावरण कसं करता येईल यासाठी त्यांच्या अंगणाचे रणांगण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. हा एक केविलवाणा प्रयत्न आहे. जनताच याचा निषेध करेल, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. 


महाराष्ट्रात जास्त रुग्ण ही वस्तूस्थिती असली तरी त्याला महाराष्ट्र कारणीभूत नाही. मुंबईतलं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे याचं प्रमुख कारण आहे. मोठ्याप्रमाणात लोक परदेशातून बाधीत होऊन इकडे आली आणि कोरोनाचा प्रसार झाला. मागच्या दोन महिन्यांपासून सरकार, स्वयंसेवी संस्था, महाविकासआघाडीचे कार्यकर्ते लोकांना मदत करत आहेत. आरोग्याची व्यवस्था राज्य सरकार उभी करत आहे. आता रुग्णालये ताब्यात घेतली जात आहेत, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं.