मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका -राज ठाकरेंची सूचना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना

Updated: Jan 27, 2020, 04:26 PM IST
मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका -राज ठाकरेंची सूचना

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रंगशारदा येथे झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी, 'मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका. हा मान फक्त बाळासाहेबांचा असल्याची, सूचना केली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पाडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला फक्त १० मिनिटं उपस्थित असले तरी त्यांनी या दरम्यान काही महत्त्वाच्या सूचना केल्याचं कळतं आहे. २३ जानेवारीच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे.

९ फेब्रुवारीला मनसेचा आझाद मैदानात मोर्चा आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातील घुसखोरांच्या विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीत शॅडो कॅबिनेटबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होणार असल्याचंही बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा विचार आणि नवा ध्वज याच्यासह मनसेने नवी सुरुवात केली आहे. मनसेच्या पहिल्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. इतक्या वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणारी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचं अचूक टायमिंग राज ठाकरे यांनी साधलं आहे. पण आधीपासूनच हिंदुत्व हा आमचा मुद्दा होता असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं.

मनसेने आता नव्याने हिंदुत्वाची वाट धऱल्याने राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या. अनेक ठिकाणी असे बॅनर देखील झळकले. पहिल्या अधिवेशनात मनसेने आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. मनसे सीएए आणि एनआरसीच्या समर्थनात उतरली आहे. पण राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हटल्यामुळे शिवसेनेकडून यावर टीका ही करण्यात आली होती.