ठाकरे कुटुंबाची सुरक्षा धोक्यात? 'मातोश्री'बाहेर ड्रोन दिसल्याने खळबळ; मुंबई पोलिस म्हणाले, 'कृपया...'

Uddhav Thackeray Residence Matoshree: वांद्रे येथील कलानगरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासहीत राहतात. 'मातोश्री 2'मध्ये उद्धव य़ांच्यासोबत त्यांची पत्नी, दोन मुले असा परिवार राहतो. याच इमारतीजवळ एक ड्रोन दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 9, 2025, 01:35 PM IST
ठाकरे कुटुंबाची सुरक्षा धोक्यात? 'मातोश्री'बाहेर ड्रोन दिसल्याने खळबळ; मुंबई पोलिस म्हणाले, 'कृपया...'
'मातोश्री'मधून शूट करण्यात आला ड्रोनचा व्हिडीओ

Uddhav Thackeray Residence Matoshree: महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची घोषणा झाली असून राजकीय वातावरणही तापलं आहे. दरम्यान या घडामोडी सुरु असतानाच आज अचानक मुंबईमधील वांद्रे परिसरात असलेल्या 'मातोश्री' निवासस्थानी ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानाची सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा त्यांच्या पक्षाकडून केला जात असून 'मातोश्री'वर नजर ठेवण्याची खेळी कोणाची आहे असा सवालही केला जात आहे. असं असतानाच आता मुंबई पोलिसांनीही या प्रकरणावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी असताना हे ड्रोन कोणी आणि कशासाठी उडवलं असे सवाल उपस्थित केले जात आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं घडलंय काय?

उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय 'मातोश्री 2'मध्ये राहतात. याच इमारतीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याचं सांगितलं जात आहे. या इमारतीबाहेर ड्रोन दिसून आलं आहे. या इमारतीच्या मागील बाजूस ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचे समोर आलं आहे. ठाकरे कुटुंबियांना ड्रोन दिसल्याचं सांगण्यात येत आहे. 'मातोश्री 2' मधूनच ड्रोनचा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

शिंदे गटाची टीका

शिंदे गटाच्या महिला नेत्या शितल म्हात्रे यांनी या दाव्यावरुन ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "सकाळपासून खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी घरात बसून बोंबा मारणारे उबाठाचे अज्ञानी नेते वाट्टेल ती बातमी पेरु लागलेत. एमएमआरडीएच्या सर्वेसाठी मातोश्रीच्या बाहेर ड्रोन पोलिसांची परवानगी घेऊन फिरवलेले होते," असं म्हात्रे यांनी म्हटलं आहे. "हे जिलेटिनच्या कांड्या उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवणारे सरकार नाही तर हे सर्वसामान्यांची काळजी घेणारे सरकार आहे," असा टोलाही म्हात्रेंनी लगावला आहे. "सगळेच उद्धटरावांसारखे संधी साधू नसतात," असंही पोस्टच्या शेवटी म्हात्रेंनी नमूद केलं आहे.

पोलिसांचं म्हणणं काय?

मुंबई पोलिसांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सोशल मीडियावरुन, "एमएमआरडीएच्या परवानगीने बीकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे, कृपया कोणतीही चुकीची माहिती टाळा," असं आवाहन केलं आहे.

अनिल परब यांचा सवाल

अनिल परब यांनी 'मातोश्री'जवळ ड्रोन फिरवलं जात असेल तर त्याबद्दल कळवणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. तसेच या भागामध्ये नेमकं कसलं सर्वेक्षण केलं जात आहे असा सवालही परब यांनी उपस्थित केला आहे.

'मातोश्री 2' आहे कसं?

वांद्रे येथील 'मातोश्री' इमारतीच्या जवळच 'मातोश्री 2' ही इमारत आहे. 10 हजार स्वेअर फूट एरिया असलेल्या इमारतीमध्ये 3 ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत. यात एकूण 5 बेडरुम, एक स्टडी रुम असल्याचं सांगितलं जातं. इथं एक होम थिएटर आणि स्विमिंग पूलही आहे. तसेच घरात मोठी जीम आणि एक छोटं सभागृहही आहे. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More