Eknath Shinde : गेल्या सरकारच्या (शिंदे सरकार) काळात मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर रस्ते कामांच्या पहिल्याच घोषणेवरुन तत्कालीन CM आणि आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अतिशय गंभीर आरोपांप्रकरणी त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याचे संकेत सध्या मिळत आहे.
मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानंतर मुंबईतील रस्त्यांसंदर्भात सोमवार (24 मार्च 2025) दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनात बैठक बोलवण्यात आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
फक्त शिंदेच नव्हे तर, मुंबईतील सर्व आमदारांनाही बैठकीला बोलवण्यात आलं आहे. या बैठकीत आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांसदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असून, त्यामुळं एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा मुंबईतील विरोधी आणि भाजपच्या सत्ताधारी आमदारांचा प्रयत्न असेल असं म्हटलं जात आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांवर विरोधकांसोबत सत्ताधारी आमदारांकडून रस्त्याचा दर्जा आणि आर्थिक व्यवहाराचे आरोप सभागृहात केले. त्यावर रस्त्यांच्या कामासंदर्भात आमदारांची समिती नेमून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी बाबत बैठक घेऊन निर्णय करु असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. ज्यावर आजच्या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो.