Mumbai Metro: नावावरुन तुफान राडा; पहिले PM केंद्रस्थानी! सत्ताधारी विरोधक आमने-सामने

Explained Mumbai Metro Aqua Line Station Issue: या विषयावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमकं हा गोंधळ काय आहे जाणून घ्या...

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2025, 09:08 AM IST
Mumbai Metro: नावावरुन तुफान राडा; पहिले PM केंद्रस्थानी! सत्ताधारी विरोधक आमने-सामने
काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने (प्रातिनिधिक फोटो)

Explained Mumbai Metro Aqua Line Station Issue: मुंबईतील वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरजवळच्या मेट्रो रेल्वे स्थानकाच्या नावावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या स्थानकाचे नाव केवळ 'सायन्स सेंटर' असे केल्याने काँग्रेसने राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. 'देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू सायन्स सेंटर ही ओळख होती, परंतु तेथील मेट्रो स्थानकाचं नाव आता फक्त 'सायन्स सेंटर' आहे. या मेट्रो स्थानकाचे नाव नेहरू सायन्स सेंटर करावे', अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Add Zee News as a Preferred Source

नेमका आरोप काय?

मुंबईची अॅक्वा लाइन मेट्रो सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोचं मागच्या आठवड्यात लोकार्पण करण्यात आलं. आता मेट्रो लाइनमधील एका स्थानकाच्या नावावरुन काँग्रेसने गदारोळ सुरु केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने हा आरोप केला आहे की मेट्रो स्टेशनचं नाव सायन्स सेंटर इतकंच ठेवण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरु सायन्स सेंटर असं नाव जाणीवपूर्वक ठेवलं नाही.

कोणी कोणी केली टीका?

मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी याप्रकरणी सोशल मीडियावरून सरकारवर जोरदार टीका केली. सावंत यांनी एक पोस्ट लिहिली आहे आणि पंडीत नेहरुंची भाजपाला अॅलर्जी आहे असाही आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करीत हे नाव बदलण्याची मागणी केली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड यांनी नव्या नावावर आक्षेप घेतला. 

सचिन सावंत यांनी काय पोस्ट केली आहे?

सावंत यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे. पंडीत नेहरु यांचं योगदान इतकं अविस्मरणीय आहे की भाजपाने त्यांचा कितीही अपमान केला किंवा त्यांचा वारसा नाकारला तरीही त्यांचे प्रयत्न अपयशीच ठरतील. सगळ्या देशाला माहीत आहे की वरळीचा जो भाग जिथे मेट्रो थ्रीचं स्टेशन आहे तिथे नेहरु सायन्स सेंटर आहे. भाजपाला पंडीत नेहरुंच्या नावाची अॅलरजी आहे त्यामुळेच त्यांनी सायन्स सेंटर इतकंच नाव मेट्रो स्थानकाला दिलं आहे.

भाजपाच्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन झालं

सावंत म्हणाले, भारताचे पहिले पंतप्रधान आणि भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या स्मृतींचा भाजपाने अपमान केला आहे. नेहरुंची दूरदृष्टी भारतासाठीचा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिक प्रगतीचा दृष्टिकोन यांचा भाजपाने अपमान केला आहे. भाजपाची कोती मनोवृत्ती, असहिष्णुता आणि तिरस्कार करण्याची वृत्ती दाखवणारी ही कृती आहे. याआधी भाजपाने दिल्लीतल्या नेहरु मेमोरियल म्युझियमचं आणि वाचनालयाचं नाव बदलून ते प्रधानमंत्री संग्रहालय असं ठेवलं होतं. तसंच नेहरु युवा केंद्राचं नाव बदलून माय भारत असं केलं. भाजपाची मानसिकता कशी आहे हेच यातून दिसून येतं.

सचिन सावंत म्हणाले, वरळी मेट्रो स्टेशनला पंडित जवाहरलाल नेहरुंचं नाव दिलं पाहिजे. जगाला कळतं आहे की भारतातील एका महान नेत्याचा कसा अपमान केला जातो आहे. भाजपाची विकृत मानसिकता आणि इतिहास मिटवण्याची वृत्ती यामुळे देशाची प्रतिष्ठा आणि जागतिक प्रतिमा धुळीला मिळाली आहे. आम्ही या लज्जास्पद कृत्याचा तीव्र निषेध नोंदवतो.

नावात कशाला पडायचं?

सायन्स सेंटर नाव महत्त्वाचे आहे. आता नेहरु सेंटर का नाही दिलं हे का नाही दिलं. यापेक्षा सायन्स सेंटर आधुनिक, विकसित भारतासाठी महत्त्वाचं आहे. नावात कशाला पडलं पाहिजे, असा सवाल भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

मेट्रोनं काय स्पष्टीकरण दिलं?

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितलं की 2013 च्या एका अधिसूचनेत मेट्रो स्टेशनचं नाव विज्ञान संग्रहालय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जी इमारत वरळीत आहे तिचं मूळ नाव विज्ञान केंद्र असंच आहे. त्यामुळेच हे नाव ठेवण्याचा निर्णय झाला होता. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रोच्या लाइन 3 चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या टप्प्याचं हे लोकार्पण होतं. सिप्झ ते कुलाबा या दरम्यान ही मेट्रो धावणार आहे. मुंबईची पहिली अॅक्वा लाइन मेट्रो ही 33.5 किमीची आहे. 9 ऑक्टोबरपासून हा संपूर्ण मार्ग सुरु झाला आहे.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More