Mumbai News : बदलत्या काळासोबत महिलांमध्ये वंधत्वाच्या समस्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. वंधत्वामुळे आई वडील न होऊ शकलेल्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ किंवा सरोगसीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र या उपाचरपद्धतींचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे अनेक जोडप्यांना अजूनही अपत्य होण्याची इच्छा अपुरीच राहत आहे. मात्र आता महाराष्ट्र सरकारने या उपचार पद्धतीचा खर्च सर्वसामान्यांना परवडावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
अपत्यप्राप्तीसाठी या महागड्या उपाचर पद्धती अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. त्यामुळे आता सरोगेसी उपचार पद्धतीचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू आहे. आरोग्य विभागाने त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे आता या उपचार पद्धतीचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. वंधत्यावर सरोगसी ही एक उत्तम उपचार पद्धती आहे. मात्र सरोगसीसाठी जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने या योजनेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने सरोगसी उपचार पद्धतीचा महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर आरोग्य विभागाकडून प्रस्ताव तयार करुन तो मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सरोगसी उपचार पद्धती महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत आल्याने पाच लाखांपर्यंतचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राज्यातील अनेक जोडप्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्भाशय विकसित न झालेल्या महिला, गर्भाशय कमकुवत असणे, वारंवार गर्भपात होणे, आयव्हीएफ उपचार पद्धती तीनपेक्षा जास्त वेळा अपयश ठरणारे, गर्भाशयाचा क्षयरोग झालेला असल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे.
काय आहे सरोगसी उपचार पद्धती?
वंधत्वामुळे त्रस्थ असलेल्या महिलेच्या गर्भात अपत्य वाढवले जाते आणि नंतर ते जोडप्याकडे सुपूर्द करण्यात येते. सरोगसी उपचार पद्धतीत पुरुषाच्या शरीरातील शुक्राणू आणि स्त्रीच्या शरीरातील बीजांड काढून त्यांचे कृत्रिमरित्या फलन घडवून आणले जाते. त्यातून निर्माण झालेल्या भ्रूणाचे दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. हा भ्रूण तिच्या गर्भाशयात वाढून मूल जन्माला येते. त्यानंतर जन्माला आलेले मूल जोडप्याला दिले जाते. त्या बालकाला गर्भाशयात वाढवून जन्म देणाऱ्या महिलेला सरोगेट मदर असे म्हटलं जाते. मात्र त्या बालकावर जन्मदात्या महिलेचा कोणताही अधिकार राहात नाही.