नाणार : कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केल्यानंतर दुस-याच दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी नाणार कार्यालयावर हल्ला केलाय.
मुंबई: मुंबईतल्या ताडदेवमधील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व पाच आरोपींना गिरगाव कोर्टात हजर केलं. सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पुढील सुनावणी येत्या गुरूवारी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केल्यानंतर दुस-याच दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी नाणार कार्यालयावर हल्ला केलाय.
काय म्हणाले होते राज ठाकरे
दरम्यान, मुलुंड येथील जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला जोरदार विरोध केला होता. या वेळी बोलताना ,'काही झाले तर कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. सरकारला काय करायचं आहे ते सरकारने करून घ्यावं. पण, हा प्रकल्प कोकणात होणार नाही', असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता.
नाणारवरून मुख्यमंत्र्यांवर हल्ला
मुख्यमंत्र्यांचे गुजरात राज्यावर जास्तच प्रेम आहे. ते म्हणतात महाराष्ट्रात नाणार प्रकल्प झाला नाही तर, तो गुजरातमध्ये जाईल. का? इतर राज्ये मेली की काय? गुजरातच का? गोवा किंवा देशातील इतर राज्ये का नाहीत, असा सवालही ठाकरे यांनी जाहीर सभेतून विचारला होता.