मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.अनेकांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यांच्या मदतीसाठी मात्र तोकडे प्रयत्न होताना दिसून येत आहेत. अनेक जण आजही पुरात अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होत आहे. अनेकांचे पुराने बळी घेतले आहेत. दरम्यान, पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब १० हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब १५ हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही मदत चेक ऐवजी रोखीने देण्यात येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र, राज्य सरकारकडून देण्यात येणारी ही अपुरी मदत असल्याची  टीका होत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरमधील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिरोळ तालुक्यात मदतीसाठी पथके पाठविण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र शासन सर्व मार्गाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे राज्य शासनाच्या संपर्कात असून केंद्राकडून लागेल ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत २ लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.



कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. तसेच ओडिसा, पंजाब व गुजरातमधील एनडीआरएफचे २२, नौदलाच्या २६, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये २ आणि कोल्हापुरात ९ पथके, सैन्यदलाचे ८ पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात एक अशी तीन पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात ७६ आणि सांगलीमध्ये ९० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.