दीपक भातुसे, मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार असा दावा आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते करत आहेत. मात्र दुसरीकडे विसंवाद आणि अंतर्गत कलहाने महाविकास आघाडीत एकमेकांविरोधात अविश्वासाचं वातावरण तयार होऊ लागलंय. दिवसेंदिवस यात भर पडताना पहायला मिळतेय. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2019 साली महाराष्ट्रात नवा राजकीय प्रयोग झाला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी अस्तित्वात आली. आघाडीचं हे सरकार चालवण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आला.
मागील दीड वर्ष या सरकारमध्ये अधून मधून कुरबुरी सुरू होत्या. मात्र मागील काही दिवसात या कुरबुरी आणि कलह वाढत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे तीनही पक्षात एकमेकांविरोधात अविश्वासाचं वातावरण आहे. त्यातच राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेला एका निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने नाराजीत आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत.
- पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसची नाराजी वाढली आहे
- काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि खुद्द मुख्यमंत्री नाराज आहेत
- शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केल्याने काँग्रेसची शिवसेनेवर नाराजी आहे
- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अविश्वास व्यक्त केलाय
- भाजपशी जुळवून घ्या या प्रताप सरनाईक यांच्या सल्लामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये शिवसेनेबद्दल अविश्वासाचं वातावरण आहे
- या पत्रामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची शिवसेनेविरोधात नाराजी वाढू लागला आहे
- सरकारमध्ये आपली कामं होत नसल्याची किंवा विश्वासात घेतलं जात नसल्याची शिवसेनेच्या आमदारांची तक्रार आहे
- त्यातच मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे
- मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता ही स्थगिती दिल्याने नाराजी वाढताना दिसत आहे
महाविकास आघाडीतील या नाराजीबद्दल तीनही पक्षांचे नेते मात्र उघडपणे काहीही बोलायला तयार नाही. तीनही पक्षात चांगला समन्वय असल्याचा दावा आघाडीचे नेते वारंवार करताना दिसतात. महाविकास आघाडीतील या स्थितीमुळेच हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. स्वतःच्या ओझ्याने हे सरकार पडेल असा दावा विरोधी पक्षाचे नेते करताना दिसतात.
महाविकास आघाडी सरकारमधील हा विसंवाद टाळण्यासाठी तीनही पक्षांना विश्वासात घेऊन निर्णयप्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. अन्यथा विसंवाद आणि अविश्वासाची दरी वाढत जाईल. आघाडीचे सरकार असले की विसंवाद, नाराजी आणि मतभेद असतातच. त्यासाठीच आघाडीत समन्वय महत्त्वाचा असतो. महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी समन्वय समितीही स्थापन केली आहे. मात्र समन्वय समिती असूनही तीन पक्षात समन्वय ठेवला जात नसल्याचं सध्याचं चित्र आहे.