मुंबई :  सरकारविरोधी आंदोलनात लहान मुलांना उतरवून राजकारण करत असल्याची टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केल्यानंतर त्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. जर थोडीशी लाज असेल तर काही काम करून दाखवा आणि कोरोनाच्या साथीपासून वाचवा, अशी टीका नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका राजकीय पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने खालची पातळी गाठली आहे आणि नवा विश्वविक्रम केला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली होती. कोरोनाच्या संकटात जेव्हा संपूर्ण जग मतभेद विसरून एकमेकांना मदत करत असताना जगात एकमेव राजकीय पक्ष राजकीय फायद्यासाठी लोकांमध्ये भीती, द्वेष आणि विभागणी करत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. भाजपने आंदोलनात लहान मुलांना उतरवल्याचा फोटो ट्वीट करून ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. लहान मुलांना घरात सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असताना राजकीय फायद्यासाठी अशी लज्जास्पद कृती केल्याची बोचरी टीका आदित्य यांनी केली होती. त्याला नितेश राणे यांनी ट्वीटरवरूनच उत्तर दिले.


आदित्य ठाकरेंना उत्तर देताना राणे म्हणाले, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी खालची पातळी आणि विश्वविक्रमाबद्दल बोलू नये. कारण त्यांच्या कणाहिन मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याची तुलना आता न्यूयॉर्कशी होतेय. जर थोडीशी लाज असेल तर काही काम करून दाखवा आणि या महासाथीपासून आम्हाला वाचवा.



आदित्य ठाकरे यांच्या म्हणतात, सत्तेच्या लालसेमुळे राजकीय नेते लहान मुलांना उन्हात आंदोलनासाठी उभे करू शकतात. पण जर कोणतेही कष्ट न घेता सत्तेच्या लालसेने जर कुणी आपल्या मुलाला पर्यटन मंत्री बनवत असेल आणि मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न साकार करत असेल तर काहीही शक्य आहे, मित्रा..., असं उत्तर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून दिले आहे.



आदित्य ठाकरे यांच्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर देऊन पुन्हा एकदा राणे-ठाकरे वाद तापत ठेवला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे मात्र राणे यांच्या कोणत्याच टीकेला उत्तर देणं टाळतात.