अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी यावर्षी एकाच दिवशी आल्याने मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. दोन्ही सण एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्याचा फायदा घातपाती कारवायांसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंदा पथकांवरील निर्बंध उठवल्याने यंदा मुंबईत अनेक ठिकाणी जोरात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने गर्दीही मोठ्या प्रमाणात होण्याती शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत गर्दीचा फायदा घेऊन घातपाती कारवाया होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हाय अलर्ट जारी केलाय. सुरक्षेचे उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलाय. 


स्वतः मुंबई पोलीस आयुक्त बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. सहपोलीस आयुक्त स्वतः गस्तीवर असणार आहेत. चारही झोनचे अतिरिक्त आयुक्त, १६ डिसीपी, हजारो मुंबई पोलिसांची फोर्स सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. तसेच  राज्य राखीव दलाच्या कंपन्याही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. साध्या वेशातले पोलीस गर्दीच्या ठिकाणी तैनात असणार आहेत. 


मुंबईत सातशे ठिकाणं संवेधनशील जाहीर करण्यात आली आहेत. समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा गस्त असेल. मोकळ्या जागी पार्कींग करण्यास मनाई करण्यात आलीय. विविध ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे. मुंबई पोलिसांनी अनुचीत प्रकार रोखण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले आहेत. पण त्याचसोबत सण साजरा करताना आपणही सतर्क राहणं गरजेचं आहे. सुरक्षेचे सर्व नियम पाळून सण साजरा करा, सतर्क राहा तरच सणाचा आनंद द्विगुणीत होईल.