`होय, फडणवीसांना भेटलो; वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नव्हे`
देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत.
मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, ही बैठक गुप्त नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल माहिती होती. 'सामना'साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा आमचा विचार आहे. त्याविषयीच आम्ही काल चर्चा केली. परंतु, आपली जाहीर मुलाखत घेण्यात यावी, अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.
सरकार पडलं तर आम्हाला दोष देऊ नका, दानवेंचा टोला
तसेच देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. याशिवाय, बिहार विधानसभा निवडणुकीचेही ते प्रभारी आहेत. मी त्यांच्याशी काल काही मुद्द्यांवर चर्चा केली. आमच्यात भले वैचारिक मतभेद असतील पण आम्ही शत्रू नव्हे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गोपीयन भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये भेटलो नाही. गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात पण वैयक्तिक वाद होत नाहीत. सत्ताधारी आणि विरोधक भेटतच असतात. भाजपसोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले नेते मानतो, असेही राऊत यांनी सांगितले.
भाजपला मोठा झटका, एनडीएतून शिरोमणी अकाली दल बाहेर
याशिवाय, अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून NDA घेतलेल्या एक्झिटवरही राऊत यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, अकाली दल हा NDA चा मजबूत स्तंभ होता. शिवसेनेला नाईलाजाने NDA मधून बाहेर पडावे लागले. NDA ला आता नवे मित्र मिळाले आहेत. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. पण ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही, त्याला मी NDA मानतच नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.