लसीऐवजी चक्क सलाईनचं पाणी!, लसीकरण घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी

मुंबईत बोगस लसीकरण करणारी टोळी उद्ध्वस्त

Updated: Jun 25, 2021, 07:34 PM IST
लसीऐवजी चक्क सलाईनचं पाणी!, लसीकरण घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी title=

कृष्णात पाटील, ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : मुंबई मुंबईच्या विविध भागात सुरू असलेल्या लसीकरण घोटाळ्याचा (Fake vaccination scam) पर्दाफाश पोलिसांनी केलाय. कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीपाठोपाठ बोरिवली, खार, वर्सोवा आणि परळमध्येही बोगस लसीकरणाचे प्रकार उघडकीस आलेत. त्यामुळं पोलीस तसंच सरकारी यंत्रणा खडबडून जागी झालीय. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (IPS Vishwas Nangre Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. गुन्ह्यांची व्याप्ती पाहता विशेष एसआयटी स्थापन केली आहे, असं नांगरे पाटील म्हणाले. बोगस लसीच्या चौकशीसाठी पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आलीय. 

बोगस लसीकरणाप्रकरणी 10 जणांना अटक

मुंबईत सुमारे 2 हजार लोकांना बोगस लसी देण्यात आल्याचं समोर आलं असून आतापर्यंत 5 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एकूण 10 जणांना अटक करण्यात आलीय. अटक आरोपींमध्ये शिवम हॉस्पिटलचे डॉक्टर शिवराज पटारिया आणि निता पटारिया यांचाही समावेश आहे. आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. धक्कादायक म्हणजे लसीऐवजी या भामट्यांनी चक्क सलाईनचं पाणी दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढं आलीय. 

बोगस लसीकरणाचं पहिलं प्रकरण

कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत सर्वात आधी बोगस लसीकरण घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर बोरिवलीच्या आदित्य कॉलेज आणि शिंपोली परिसरातील मानसी शेअर्स अॅण्ड स्टॉक अॅडव्हर्टायझर्स कंपनीनं आयोजित केलेल्या शिबिरात बोगस लसी देण्यात आल्या. वर्सोवा आणि खारमध्ये टिप्स कंपनीत, तर मालाडमध्ये बँक ऑफ बडोदामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोगस लसी दिल्या. परळमध्ये पोद्दार एज्युकेशन सेंटरनं आयोजित केलेल्या शिबिरातही बोगस लसी दिल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय...

या टोळीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटमार्फत कुठे लसीकरण झालं असेल, काही शिबीर राबवले असतील त्याची माहिती आम्हाला द्या, नावं गुप्त ठेवली जातील. असं आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केलंय.