)
Mumbai India Job Crisis News : जग कशा प्रकारे विविध घटकांमुळं एकसंध आहे आणि एकही घटक कमकुवत पडला तर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचीच प्रचिती सध्याची राजकीय आणि आर्थिक परिस्थिती पाहता लक्षात येत आहे. जगभरात सुरु असणारी युद्ध, तणावाची परिस्थिती, पुरवठा साखळीवर झालेले गंभीर परिणाम, इंधन तुटवडा या साऱ्याचं फलित म्हणजे सामान्यांचं भरडलं जाणं. भारतापर्यंत आखाती देशांतील तणावाचे वारे वाहू लागले आणि इंधन संकटाची चाहूल केंद्रापर्यंत लागली. नागरिकांना इंधनाचे साठे सांभाळून वापरण्याचं आवाहन खुद्द पंतप्रधनांनी केलं असतानाच सामान्यांना भलतेच प्रश्न पडू लागले. अर्थात देशात तूर्तास लॉकडाऊन किंवा तत्सम स्थिती किंवा नियम लागू नसले तरीही हे चित्र दिसतंय तितकं सोपंही नाही ही मात्र वस्तूस्थिती.
नुकतीच करण्यात आलेली इंधन बचतीसह आर्थिक बचतीची आवाहनं पाहता विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीवर याचे परिणाम दिसून येत आहेत. कलाविश्वसुद्धा यास अपवाद ठरलेलं नाही. 'द फेडरल'नं एका सर्वेक्षणाचा हवाला देत सध्या कलाजगताशी संलग्न काम करणाऱ्या व्यक्तींना काम मिळण्याचं प्रमाण कमी झालं आहे, ज्यांना काम मिळत आहे त्यांना दिलं जाणारं मानधन तब्बल 50 ते 60 टक्क्यांनी कमी झालं आहे.
उलटपक्षी कलाजगतातील बडे कलाकार मात्र या संकटापासून दूर असून, त्यांना मोठ्या भूमिकांसाठी दांडगी रक्कम मोजली जात आहे. पण, खरा भार येतोय तो म्हणजे सिनेक्षेत्रात पडद्याआड काम करणाऱ्या हजारो कामगारांवर. ज्यांच्यामुळं हे क्षेत्र आतातरी सुरळीतपणे कार्यरत आहे. प्रामुख्यानं छोट्या भूमिका किंवा सहाय्यक भूमिकांमध्ये असणारे कलाकार, असिस्टंट डिरेक्टर, मेकअप आर्टिस्ट, जीम ट्रेनर, लाईटमॅन, कॅमेरामॅन, स्पॉट बॉय, प्रोडक्शन असिस्टंट, एडिटर, समानाचा पुरवठा आणि ने- आण करणारी माणसं, तांत्रिक विभागाची कामं पाहणारी मंडळी यांच्यावर सद्यस्थितीचा परिणाम सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहे. यापैकी काहीजण हे दैनंदिन तत्त्वावर मिळणाऱ्या काम आणि मानधनावर अवलंबून आहेत. पण, सध्या निर्मिसंस्थांनी खर्चाच्याच बाबतीच हात आवरता घेतल्यामुळं अनेकांच्याच खात्यावर अपेक्षित रक्कम येत नाहीये.
गेल्या काही महिन्यांपासूनच कलाक्षेत्रातील या मंडळींच्या कामावर परिणाम होत असून, OTT वरही खर्चात मोठी कपात झाली आहे. ज्यामुळं दैनंदिन कामही मिळणं आव्हानात्मक होऊन बसलं आहे. देशभरातील कलाक्षेत्रात ही स्थिती असतानाच मुंबईत याचे गंभीर परिणाम दिसत आहेत. जिथं अनेकांनाच कलानगरीनजीक राहण्याच्या ठिकाणांचा खर्चही भागवणं कठीण झालं आहे.
सिनेमा आणि मालिकांसाठी काम करणाऱ्या अनेक कामगारांचे भत्ते अर्ध्यावर आणण्यात आले आहेत. त्यामुळं दैनंदिन खर्च भागवतानाही त्यांची ओढाताण होत आहे. काहींनी तर Saving चे पैसे खर्च करण्यास सुरुवात केली आहे. हाताला काम नाही, राहायला घर नाही, घर आहे तर भाडं परवडत नाही, मुंबईसारख्या शहरात दिवसभरचा खर्च भागत नाही या आणि अशा अनेक कारणांनी कित्येकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनयापासून कलाकांचा पेहराव पुरवणारे, सेटवर काम करणारे, लाईटची कामं करणारे अशी संपूर्ण साखळीच या तणावामुळं प्रभावित झाली असून, तिचा वेग प्रचंड प्रमाणात मंदावला आहे.
आर्थिक संकटामुळं अनेकांची मानधनं, पगार रखडले आहेत. महिनोन् महिने हक्काच्या पैशांसाठी ही मंडळी झगडत आहेत, ज्यामुळं तणावाचा भार वाढतच चालला आहे. पाच वर्षांपूर्वी ज्या परिस्थितीचा सामना साऱ्यांसह या कलाजगतानं केला, तेच दिवस आता परतणार का? हाच भीतीदायक प्रश्न आता या क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक होतकरुंना सतावत आहे.