डोंबिवली: कल्याण आणि डोंबिवली परिसरातील कोविड रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन साठा करुन ठेवावा, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ऑक्सिजनअभावी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर संपल्यानंतर तब्बल तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. या काळात दोन अत्यवस्थ रुग्ण ऑक्सिजनअभावी तडफडत होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्री रुग्णालयात दररोज गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीतील सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा करुन ठेवावा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात आपण काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांना पत्रही पाठवले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला. 



शुक्रवारी सकाळी रुग्णांना उपचार करताना उपलब्ध असलेले सिलिंडर संपण्यापूर्वीच ते पुरविण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला तातडीने सिलिंडर आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही ते न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाला तीन तास सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागली. उपलब्ध सिलिंडर संपलेले असताना ठेकेदाराकडून वेळेवर पुरवठा न झाल्यामुळे दोन अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजनअभावी तडफडावे लागल्याचे भीषण वास्तव या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या अन्य रुग्णांनी अनुभवले. 



याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की कोविड-१९ ग्रस्त रुग्णांना बहुतांश उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. महानगरपालिका क्षेत्रात वाढत चाललेले रुग्ण पाहता रुग्णालयांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनची कमी भासू शकते. काही दिवसांपूर्वी बिल मिळाले नसल्याने ऑक्सिजन पुरवठादारांनी तीन दिवस पुरवठा बंद केला होता. अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास परिस्थिती अधिकच बिघडू शकते. त्यासाठी आधीच पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे.तरी कृपया आपण तात्काळ लक्ष घालून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांची अडचण होऊ नये, याकरिता सर्व रुग्णालयामध्ये किमान पुढील १० दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा करण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत. तसेच रुग्णालात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी राजू पाटील यांनी पालिकेकडे केली आहे.