मुंबई : ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी  पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहे.


यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदाचा आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन 2005 मध्ये महावितरण, महापारेषण,  महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेल्यानंतरही अपेक्षित भरती झाली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढल्याने ताण निर्माण झाला आहे. आता लवकरच पदभरती होत असल्याने नोकरीची संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.


यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरण


यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे.  यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार आहे.