मुंबई : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. अनेक संघटनांकडून बंदला पाठिंबा देण्यात आला आहे. असल्फा, घाटकोपरमध्ये पहाटे बेस्टची बस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घाटकोपरच्या कार्यकर्त्यांनी बस अडवली होती मात्र आता वाहतूक सुरळीत सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व संशोधन कायदा आणि NRC विरोधात आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र बंद असणार आहे. आंबेडकरांच्या या महाराष्ट्र बंदच्या निर्णयाला ३५ संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. 


CAA कायदा देशभरात लागू झाला आहे. या कायद्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आली. अनेक ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं. संविधान विरोधी काम करून केंद्र सरकार नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. या बंदमध्ये कामगार संघटना, मुस्लीम संघटना सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 



सीएए अर्थात सिटीझनशिप अमेंडमेंट अॅक्टबाबत अनेकांमध्ये संभ्रम देखील दिसून आला. आधीपासून अस्तित्वात असलेल्या नागरिकत्व कायद्यामध्ये केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. सुधारणा तशी लहानशीच आहे, पण त्याला होत असलेला विरोध मात्र हाताबाहेर जातोय की काय अशी स्थिती आहे. 


दरम्यान, याआधी मुंबईत वंचित बहुजन आघाडीने धरणं आंदोलन पुकारलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५ हजारहून अधिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधात हे धरणं आंदोलन आहे.